atalbihari vajpeyi meeting in karad 47 years ago | Sarkarnama

47 वर्षापुर्वी कऱ्हाडकरांनी वाजपेयींना दिली होती 75 हजारांची थैली! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

जनसंघाच्या प्रचारासाठी 21 एप्रिल 1970 रोजी वाजपेयी यांची टिळक हायस्कूलमध्ये जाहीर सभा झाली. त्यावेळचे पालिकेचे नगरसेवक श्रीनिवास लद्दड यांनी त्या सभेचे आयोजन केले होते. 

कऱ्हाड (सातारा) : अटलबिहारी वाजपेयी यांनी 47 वर्षापुर्वी जनसंघाच्या प्रचारासाठी कऱ्हाडला सभा घेतली होती. "भारत को महासत्ता बनाना है, तो जनसंघ का संघटन महत्वपूर्ण है', असे आवेशपूर्ण भाषण करून त्यांनी जनसंघाचे महत्व पटवून दिले होते. याच कार्यक्रमात त्यांना 75 हजारांची थैली भेट देण्यात आली होती. 

श्री. लद्दड यांचे चावडी चौकात श्री वल्लभ नावाचे कपड्याचे शोरूम आहे. दिनेश लद्दड यांचे वडील श्रीनिवास लद्दड 1970 च्या काळात नगरसेवक होते. श्रीनिवास लद्दड यांचा मृत्यू होवून आता पंधरा वर्षापेक्षा जास्त अवधी लोटला आहे. 

ती सभा दुपारी होणार होती. सभेपुर्वी श्री. वाजपेयी यांनी श्री. लद्दड याच्या घरी भेट दिली होती. तो प्रसंग लद्दड कुटूबियांना आजही आठवतो आहे. अर्थात त्या घटनेला 47 वर्ष झाली आहेत. मात्र वाजपेयी यांच्या भाषणाचे छायाचित्र अद्यापही त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय वाजपेयी यांचे छायाचित्र टिळक हायस्कूलचे त्याकाळातील कला शिक्षक पा. ह. देशपांडे यांनी रेखाटले होते. तेही त्यांनी जतन करून ठेवले आहे. 

दिनेश लद्दड म्हणाले, त्या काळात जनसंघाचे काम करणे तसे कठिण होते. मात्र त्यातूनही वडीलांनी सभा ठेवली होती. सभेत अठलजींचा आवेश बघण्यासारखा होता. त्यावेळी त्यांना मदत म्हणून 75 हजारांची थैली देण्यात आली होती. त्यावेळी ते भावूकही झाले होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख