ईदची भेट म्हणून अटलजी माझ्या मुलांच्या हातावर चांदीचे नाणे ठेवत ! 

ईदची भेट म्हणून अटलजी माझ्या मुलांच्या हातावर चांदीचे नाणे ठेवत ! 

लखनौ : "" अटलजी गेले ! ही बातमी जेव्हा येऊन धडकली. तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला. डोळ्यांच्या कडा भरल्या. अटलजी आमच्यासाठी कोण होते ? हे मी शब्दात नाही कथन करू शकत. दु:खाचा डोंगर असल्याने आम्ही बकरी ईद पुढील आठवड्यात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे; अशी माहीती उत्तरप्रदेश उर्दू अकादमीच्या अध्यक्षा आसिफा झमानी यांनी दिली. 

अटलजींच्या आठवणींना उजाळा देताना आसिफा म्हणाल्या, "" माझे पती अझिझ रिझवी आणि अटलजी एकमेकांना चांगले ओळखत. त्यांची घट्ट मैत्री होती. रिझवी हे ही राजकारणात होते. अटलजी जेव्हा लखनौमधून निवडणूक लढवित असत. तेव्हा त्यांचा फॉर्म भरण्याची जबाबदारी माझे पती रिझवी यांच्यावर असे. फॉर्म भरण्याच्या एकदोन दिवस अगोदर अटलजींचा फोन यायचा. ते म्हणायचे,"" सर्व तयारी करून ठेवा. मी येत आहे.'' 

अटलजी आले की फॉर्म भरला जाई. तो बिनचूक असे. म्हणूनच रिझवी यांच्यावर त्यांचा अतिशय विश्वास होता. ज्यावेळी देशात पक्षाचे (त्यावेळी जनसंघ) दोनच खासदार निवडून येत होते. तेव्हापासून माझे पती आणि अटलजींची दोस्ती होती.'' असेही आसिफा सांगून जातात. 

अटलजी जेव्हा दिल्लीहून लखनौला येत असंत तेव्हा रिझवी हे त्यांना घेण्यासाठी चारबाग रेल्वे स्टेशनवर जात असे सांगताना आसिफा म्हणाल्या,"" ईद असताना जर ते "यूपी'त असले तर ते आमच्या घरी येत. ईदनिमित्त शुभेच्छा देत. त्यांना किमामी सेवई खूप आवडत असे. घरात पाय ठेवला की ते म्हणत,"" कुठे आहे सेवई ? चटकन आणा !'' 

अटलजींना काय आवडते हे माहीत असल्याने मी त्यांच्यासाठी वेगळी सेवई तयार करीत असे. ते गोड कमी खात. कधी अधिक गोड झाले तर म्हणत, "" किती गोड केलय. पण, ते आनंदाने सेवई खात. आमचे घर सोडताना अटलजी, माझा मुलगा असिफ आणि कन्या सिमा यांच्या हातावर ईदची भेट म्हणून चांदीचे नाणे ठेवत. अटलजींच्या खूप गोड आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवल्या आहेत.'' 

आसिफा यांचा मुलगा असिफ यांनी सांगितले, की माझ्या वडीलांच्या निधनानंतर वाजपेयीसाहेबांनी आम्हाला खूप आधार दिला. त्यांनी माझ्या बहिणीला दोनवेळा आमदार केले आणि मंत्रीही. 2009 मध्ये माझी बहिण मंत्री होती याचे श्रेय वाजपेयींनाच जाते.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com