Atal Behari Vajpayees favorite Dishes in Pune | Sarkarnama

पुरणपोळी आणि सुरळीच्या वड्या अटलजींच्या आवडीच्या : पुण्यात येताच हा मेनू ठरलेला

उत्तम कुटे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

शुद्ध शाकाहारी असलेले माजी पंतप्रधान आणि भाजपचे माजी अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुरणपोळी आणि सुरळीच्या वड्या या खूप आवडीच्या. त्यामुळे ते महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्य़ात आले की या दोन पदार्थांचा आस्वाद घेत असत.

पिंपरी : शुद्ध शाकाहारी असलेले माजी पंतप्रधान आणि भाजपचे माजी अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुरणपोळी आणि सुरळीच्या वड्या या खूप आवडीच्या. त्यामुळे ते महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्य़ात आले की या दोन पदार्थांचा आस्वाद घेत असत. मराठी समजणारे अटलजी महाराष्ट्रातील भाषणात मध्येच मराठीही बोलत असत, अशी आठवण त्यांच्या 1984 च्या पुणे दौऱ्यात त्यांचे सहाय्यक म्हणून काम केलेले भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेश कुलकर्णी यांनी सांगितली. 

पुण्यातील श्रेयस हॉटेल त्यांच्या आवडीचे. पुण्यात आले की ते तेथेच राहत. हॉटेलचे मालक बाळासाहेब चितळे यांनाही अटलजींच्या सर्व आवडीनिवडी माहित. 1984 ला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे तीन दिवसाचे अधिवेशन पुण्यात होते. 29 व 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर असे ते टिळक स्मारकमंदिर येथे झाले. त्यावेळी अ़टलजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अटलजी, लालकृष्ण अडवानी आणि विजयाराजे सिंदिया या अधिवेशनाला आले होते. 

यावेळी कुलकर्णींनी त्यांचे सहाय्यक (व्यवस्था) म्हणून काम पाहिले. ते त्यावेळी भाजपच्या युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस होते. मोटारीत ते मागे बसले की मी पुढे वा ते पुढे असतील, तर मी मागे बसायचो. तसेच दर दोन तासांनी त्यांना काय हवे ते विचारायचो,अशी आठवण कुलकर्णींनी सांगितली.

अधिवेशनकाळात अटलजी शंतनुराव किर्लोस्कर आणि नीळकंठ कल्याणी यांच्या घरी गेले होते. त्यांच्यामुळे मला या दोघा उद्योगपतींच्या बंगल्यावर जाता आले, असे कुलकर्णी म्हणाले. या दौऱ्यातच त्यांनी उद्योगपती, वकील अशा विशेष निमंत्रितांसाठी नटराज हॉटेलात भोजन आयोजित केले होते. त्यालाही मी उपस्थित होतो, असे कुलकर्णी यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवड दौऱ्याची आठवण सांगताना कुलकर्णी म्हणाले, "अटलजी तीनदा पिंपरी-चिंचवडला आले. तिन्ही वेळा ते लोकसभा निवडणुक प्रचार सभेसाठीच आले. त्यांच्या या तिन्ही सभा जंगी झाल्या.त्यावेळी पिंपरी-चिंचवड हे बारामती लोकसभा मतदारसंघात होते. प्रथम ते 1980 आले. त्यावेळी मोहन धारिया उमेदवार होते. 1984 ला ते आले. तेव्हा संभाजीराव काकडे रिंगणात होते. तर, 1998 ला ते आले तेव्हा विराज काकडे आखाड्यात होते. फर्डे वक्ते असलेले अटलजींच्या या तिन्ही सभा गाजल्या होत्या.'' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख