Atal Behari Vajpayee New Delhi Yugandhar Program | Sarkarnama

कृष्ण चरित्र ऐकायला वाजपेयी येतात तेव्हा.....

अमित गोळवलकर
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

पुस्तक परिचयासारखा कार्यक्रम. तो ही मराठीत. श्रोते जेमतेम 35-40. अचानक आगमन होतं अटल बिहारी वाजपेयीचं आणि मग नंतरचे दीड - दोन तास मंत्रमुग्ध अवस्थेत जातात....अटलजींबाबतची एक आठवण

मी 1995 मध्ये नवी दिल्लीत दैनिक केसरीचा विशेष प्रतिनिधी म्हणून काम पहात होतो. त्यावेळी रविवारची सायंकाळ तशी कंटाळवाणीच जायची. अशातच एके दिवशी दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्राकडून एक आमंत्रण आलं. छावा आणि मृत्युंजयकार कै. शिवाजी सावंत यांची श्रीकृष्णाच्या जीवनावरची 'युगंधर' ही कादंबरी लवकरच प्रकाशित होणार होती. या कादंबरीच्या काही भागांचे वाचन काॅन्स्टिट्युशन क्लबच्या एका छोट्याशा हाॅलमध्ये होणार होतं. 

सायंकाळी माझ्या पत्नीला घेऊन मी या कार्यक्रमाला गेलो. मराठीतला कार्यक्रम. दिल्लीत मराठी भाषकांचं प्रमाण मोठे असले तरीही कार्यक्रमाला तुरळकच गर्दी होती. जेमतेम 35-40 प्रेक्षकच उपस्थित होते. समोरच छोटेखानी स्टेज. कार्यक्रमाला थांबावं का नाही या विचारात असतानाच अचानक प्रवेशद्वारापाशी लगबग झाल्याचं दिसलं. हातात बंदुका घेतलेले ब्लॅक कॅट कमांडो आत आले. अशा कार्यक्रमात कमांडो पाहून अनेकांच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटल्याचं ठळकपणे दिसत होतं. 

काही क्षणातच जॅकेट घातलेली थोडी स्थूल असलेली अटल बिहारी वाजपेयींची मूर्ती दरवाजातून आत येताना दिसली. आश्चर्याचे उद््गार तोंडातून बाहेर पडले. अटलजी आले आणि थेट पहिल्या रांगेत व्यासपीठासमोर जाऊन बसले. संयोजकांची पंचाईत होणं स्वाभाविकच होतं. खुद्द (कै.) सावंत यांचीही धावपळ उडाली. संयोजक लगबगीनं अटलजींच्या दिशेनं गेले आणि त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली. ''मी श्रोता म्हणून आलोय, प्रमुख पाहुणा म्हणून नाही," असे म्हणत अटलजींनी हे निमंत्रण नम्रपणे नाकारलं.

काॅन्स्टिट्युशन क्लबच्या मागच्या बाजूलाच रायसिना रोडवर अटलजींचं निवासस्थान होतं. ते त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. या कार्यक्रमाचं औपचारिक निमंत्रण अटलजींना मिळालं होतं किंवा नाही, हे आता सांगता येत नाही. पण या कार्यक्रमाची माहिती मिळाल्यानंतर वाजपेयी स्वतःहून तिथं आले होते, असं काहीसं त्यावेळी ऐकल्याचं आठवतं. कार्यक्रमाच्या संयोजकांनी खूपच आग्रह केल्यावर अटलजी थोड्या नाखुषीनंच व्यासपीठावर गेले. 

त्यानंतरचा दीड तास ही सभागृहात उपस्थित असलेल्या माझ्यासह मोजक्या श्रोत्यांसाठी मेजवानीच होती. (कै.) शिवाजी सावंत यांच्या तोंडून त्यांच्या आगामी कादंबरीची मोजकी प्रकरणं ऐकणं आणि त्यानंतर अटलजींचं विवेचन. मंत्रमुग्ध होणं याची अनुभूतीच त्यावेळी आम्हाला मिळाली. अटलजींनी भाषण सुरु केलं ते कार्यक्रमाचं औचित्य साधत मराठीतून. मराठी कसा शिकलो इथपासून सुरु झालेली त्यांच्या भाषणाची सुरुवात श्रीकृष्णाच्या जीवनापर्यंत कशी पोचली हे समजलंच नाही. आताच्या क्षणी त्यावेळी लिहिलेल्या बातमीचं कात्रण हाताशी नाही. पण त्या दिवशीची आठवण मात्र मनात दडून बसली आहे. 

संबंधित लेख