मंत्रालयात सहसचिव पदोन्नतीला खीळ ! 

मंत्रालयात सहसचिव पदोन्नतीला खीळ ! 

मुंबईः राज्याच्या विकासाचा गाडा हाकताना जनतेच्या कल्याणाची ध्येय-धोरणे आखण्यासाठी मंत्रालयात अनुभवी अधिकारी असणे गरजेचे आहे. विविध विभागांत सेवा करत पदोन्नतीने सहसचिव पदावर पोचणे, हे मंत्रालयात निवड झालेल्या प्रत्येक अधिकाऱ्याचे स्वप्न असते, मात्र आता या स्वप्नालाच खीळ बसली आहे. 

यामागे सामान्य प्रशासन विभागातील (जीएडी) "शुक्राचार्यां'चा प्रताप असल्याचे सांगितले जाते. सहसचिव पदोन्नती रखडल्यामुळे मंत्रालयात विविध विभागांत अनुभवी अधिकाऱ्यांची वानवा निर्माण झाली आहे.
 
सहायक कक्षाधिकारी, कक्षाधिकारी, अवर सचिव, उपसचिव आणि सहसचिव अशी वरच्या श्रेणीत जाणारी पदे मंत्रालयात आहेत. यात सहायक कक्षाधिकारी आणि कक्षाधिकारी ही पदे थेट निवड पद्धतीने भरली जातात. त्यानंतर पदोन्नतीने पुढील पदे भरली जातात. मंत्रालयात साधारण सात ते आठ वर्षांत पदोन्नती होते. त्यासाठी विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक होते. ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत साधारणपणे ही बैठक होते. त्यानंतर आरक्षण, बिंदुनामावली आदी बाबींचा विचार करून पदोन्नती दिली जाते. 

उपसचिव ते सहसचिव या पदोन्नतीसाठी जानेवारी 2018 मध्ये "डीपीसी' झाली. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव हे या "डीपीसी'चे प्रमुख असतात. सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यासन-14 ने थातूरमातूर कारण देत पात्र कोणत्याही उपसचिवास सहसचिवपदाची पदोन्नती दिली नाही. या कार्यासनातील "शुक्राचार्यां'नी ही अडवणूक केली आहे. 

यामागे केवळ वैयक्‍तिक आकस असल्याचे सांगितले जाते. सध्या 15 सहसचिवांच्या जागा रिक्‍त आहेत. त्याजागी उपसचिवांना पदोन्नती दिली असती तर मंत्रालयातील विविध विभागांना अनुभवी अधिकारी मिळाले असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसचिवांच्या 27 पदांना दोनवेळा मंजुरी दिली आहे. त्यामुळे सहसचिवांची नऊ पदे वाढतात. सध्या 15 पदे रिक्‍त आहेत. याकडे डोळेझाक करण्यात आली आहे. 

 तुला न मला; घाल कुत्र्याला! 
मंत्रालयातील संवर्ग हा मंत्रालयातपुरताच मर्यादित असतो. त्यामुळे ही पदे रिक्‍त असताना त्या ठिकाणी महसूल विभागातील अधिकारी शिरकाव करतात. त्यामुळे महसूल विभागाची लॉबी ही पदे भरूच नये, यासाठी कार्यासन-14च्या मदतीने सक्रिय झाल्याचे सांगितले जाते. परिणामी "मला न तुला अन्‌ घाल कुत्र्याला' अशी अवस्था झाली आहे. 

चौकट 
- मंत्रालयात उपसचिवांची पदेः 97 
- मंत्रालयात सहसचिवांची पदे : 56 
- सहसचिवांची सध्याची रिक्‍त पदेः 15 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com