Ashok Pawar VS Praksh Pawar | Sarkarnama

शिरूरमधील दोन पवारांचे एकमेकांवर पलटवार 

नितीन बारवकर
रविवार, 20 ऑगस्ट 2017

विधानसभा मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर शिरूर तालुक्‍यातील 39 गावे आंबेगाव मतदारसंघाला जोडल्यानंतर त्या भागातील नेते आणि मूळच्या शिरूर मतदार संघातील साठ गावांतील नेते असा "भागाचा सुप्त वाद' गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाला. "राष्ट्रवादी' अंतर्गत हा वाद अधिक टिपेला पोचल्याचे गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींवरून सिद्ध झाले. 

शिरूर : माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाला उघड आव्हान देत पक्षासह सर्व पदांचे राजीनामे दिल्यानंतर उघड उठाव करू पाहणाऱ्या बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांची समजूत काढण्याऐवजी अशोक पवार गोटातून त्यांना प्रतिआव्हानाचा पवित्रा घेण्यात आल्याने "राष्ट्रवादी' अंतर्गत हा वाद विकोपाला जाण्याची शक्‍यता आहे. 

तालुक्‍यातील सर्व छोट्या - मोठ्या निवडणुकांचा धुरळा खाली बसला असतानाच; दोन पवारांतील वादाने "राष्ट्रवादी' ला पुन्हा कलहाचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. 

विधानसभा मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर शिरूर तालुक्‍यातील 39 गावे आंबेगाव मतदारसंघाला जोडल्यानंतर त्या भागातील नेते आणि मूळच्या शिरूर मतदार संघातील साठ गावांतील नेते असा "भागाचा सुप्त वाद' गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाला. "राष्ट्रवादी' अंतर्गत हा वाद अधिक टिपेला पोचल्याचे गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींवरून सिद्ध झाले. 

या 39 गावांतील नेते साहजिकच त्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांचे नेतृत्व मानतात; तर साठ गावांतील पक्षाची धुरा अशोक पवार यांच्या खांद्यावर आल्याने तेच शिरूरमधील "राष्ट्रवादी' चे सर्वेसर्वा झाल्याचे दिसून येते. या विभागणीमुळे वळसे पाटील व अशोक पवार यांच्यातही शीतयुद्ध सुरू झाले असून, या लढ्यात स्थानिक नेते, पदाधिकारी आपापल्या नेत्याची री ओढताना एकमेकासमोर उभे ठाकल्याचे काही प्रसंगांत प्रकर्षाने दिसून आले आहे. 

नुकत्याच झालेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 39 गावांना पुरेसे प्रतिनिधित्व न दिल्याचा मुद्दा उपस्थित करून त्या भागातील उमेदवारांनी चक्क "राष्ट्रवादी' च्या पॅनेलला मिळालेले अधिकृत चिन्ह नाकारून प्रथम बंडाचा झेंडा उभारला. माजी आमदार पोपटराव गावडे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्यासह प्रकाश पवार यांनी हा बंडाचा झेंडा अधिक त्वेषाने फडकत ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. पुढे बाजार समितीच्या सभापतिपदासाठी पाचुंदकर व पवार हे तीव्र इच्छुक असताना अशोक पवार यांनी दोघांना डावलून आपल्या भागातील शशिकांत दसगुडे यांना सभापतिपदावर बसविले; इतकेच नव्हे तर उपसभापतिपदाची संधीही विश्‍वास ढमढेरे यांच्या माध्यमातून आपल्याच भागाला दिली. 

बाजार समितीचे दोन्हीपैकी एकही पद न मिळालेले 39 गावातील संचालक कमालीचे नाराज झाले. पाचुंदकर यांनी सुरवातीला राजीनामा अस्त्र उपसले व त्यांनी या सर्व प्रकाराला अशोक पवार जबाबदार असल्याचे जाहीररीत्या सांगून प्रथम अशोकबापूंशी पंगा घेतला. त्यानंतरच्या काळात सोशल मिडीयावरून त्यांच्या दैनंदिन संदेश फलकातील अशोक पवारांचा फोटोही गायब झाला. "वळसे पाटलांचा कार्यकर्ता हेच माझ्यासाठी सर्वांत मोठे पद' असे ठणकावून सांगत नंतर त्यांनी पक्षाशी जुळवून घेतले खरे मात्र अशोकबापूंशी त्यांचे मनोमिलन अद्याप होऊ शकलेले नाही. 

हे प्रकरण मिटलेले नसतानाच प्रकाश पवार यांनी मुदत पूर्ण झाल्याने घोडगंगा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देताना कारखान्याच्या व बाजार समितीच्या संचालकपदाचा; इतकेच नव्हे तर पक्षाचाही राजीनामा दिला. काल त्यांनी या दोन्ही संस्थांचा राजीनामा दिला असून, पक्षाच्या राजीनाम्याबाबतची अधिकृत माहिती समजू शकली नाही. 

आमच्यासारख्यांमुळे अशोकबापूंना राजकारणात अडचणी येत होत्या. त्यांच्या राजकारणाच्या सोयीसाठी राजीनाम देत असल्याचे उद्वेगाने नमूद करणाऱ्या प्रकाश पवारांनी या पवित्र्यातून अशोकबापूंना उघड आव्हान दिल्याचे सिद्ध झाले आहे. अशोकबापूंना त्यांच्या भविष्यातील वाटचालीत ही आव्हाने महागात पडणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असले; तरी "भागाचा' मुद्दा लक्षात घेता मतदार संघ सुरक्षित करताना केलेले डावपेच अशोकबापूंच्या पथ्यावरच पडणार आहेत. कारण पोपटराव गावडे, प्रकाश पवार व पाचुंदकर यांची "हुकूमत' असलेली गावे आंबेगाव मतदारसंघात येत असल्याने ही राजकीय धुमश्‍चक्री अशोकरावांसाठी पेल्यातील वादळच ठरण्याची शक्‍यता आहे. अशोकबापूंच्या भावी राजकीय वाटचालीला प्रकाश पवार यांच्या राजीनाम्याने काहीही फरक पडणार नसल्याचेही राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत. 

प्रकाश पवार यांच्या या पवित्र्याने पक्षातील बेदीली वेशीवर टांगली गेली असून, या अंतर्गत खदखदीचा फटका पक्षप्रतिमेला बसू शकतो. या वेगवान घटना घडामोडीमुळे तूर्तास पक्षफूटीचा धोका संभवत नसला; तरी राष्ट्रवादीअंतर्गत शिरूर - आंबेगाव हा भागाचा वाद पुन्हा एकदा तीव्रतेने पेटण्याची व त्यातून पक्षाला मारक बाबी भविष्यात पक्षनेतृत्वासमोर व पक्षासमोर उभ्या राहण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. अर्थात याचा फायदा भाजपने व्यवस्थित उठवला आहे. बघा, अशोक पवारांच्या हुकूमशाहीला त्यांच्याच पक्षातील लोक कसे कंटाळलेत, हे भाजपने सांगावयास सुरवात केली आहे. 

संबंधित लेख