Ashok Chavan takes a dig at Prime Minister Narendra Modi | Sarkarnama

वल्लभभाई पटेलांच्या विचारांची ऊंची मोदींकड़े नाही :  अशोक चव्हाण

संजय जाधव 
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

सत्तेत राहून विरोधाचे नाटक करणाऱ्या शिवसेनेवरही चव्हाणांनी तोंडसुख घेतले. ते म्हणाले ,"शिवसेनेची स्थिती सुध्दा वेगळी नाही, सेना- भाजप म्हणजे बाहेरून  कीर्तन आतून तमाशा असा प्रकार आहे. हे सरकार सत्तेतून घालवल्याशिवाय देशाचा व राज्याचा विकास होणार नाही."

कन्नडः "खोटी आश्वासने देऊन व महापुरुषांचे नावे घेऊन भाजपने सत्ता हस्तगत केली. मात्र सामान्य माणसाला ते न्याय देवू शकले नाही. महाराष्ट्रातील जनता दुष्काळाने होरपळत आहे, मात्र सरकार संवेदनशील नाही.  राफेल घोटाळयात चाळीस हजार कोटीचा मालिदा कुणाला मिळाला याचा हिशोब आगामी काळात जनतेने  भाजपला विचारण्याची वेळ आली आहे .  आपल सरकार जहिराती दमदार, एवढाच राज्यकारभार सुरु आहे," अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपवर टिका केली. 

कन्नड शहरातील गिरणी मैदानवर बुधवारी (ता.31) कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आली होती. या निमित्ताने अशोक चव्हाण यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात भाजपच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढवला. "भाजप सरकार संवेदनशील नसून त्याना राज्य कारभार करता येत नाही. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयाचे अनावरण देशाच्या पंतप्रधानांनी केले खरे, पण त्यांच्या विचारांची ऊंची मोदींकड़े नाही ,'असा टोला देखील चव्हाण यांनी लगावला. 

"महाराष्ट्राचे दैवत पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याची मुख्यमंत्र्यांची प्रथा यंदा मोडीत निघाली. पण देवानेच त्यांना ही संधी मिळू दिली नाही ,'असा चिमटा काढतांनाच आगामी काळात जनतेने कांग्रेस पक्षासोबत राहावे असे आहवान देखील अशोकराव चव्हाण यांनी केले. 

 

संबंधित लेख