आंबेडकरांना ओवेसीपासून तोडण्यात अशोक चव्हाण यशस्वी?

राजकारणात काहीही घडू शकते, याची प्रचिती नांदेड येथील कालच्या वंचित आघाडीच्या सभेनंतर आली.
आंबेडकरांना ओवेसीपासून तोडण्यात अशोक चव्हाण यशस्वी?

नांदेड : प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची बहुजन वंचित आघाडी काॅंग्रेसच्या मतांना खिंडार पाडणार असल्याच्या भीतीने काॅंग्रेसच्या नेत्यांच्या मनात धसका होता. मात्र काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याच नांदेड शहरात ओवेसी यांच्यापासून आंबेडकर यांना तोडण्यात चव्हाण यशस्वी तर झाले नाहीत ना, अशी शंका कालच्या नांदेड येथील सभेनंतर निर्माण झाली आहे. तसे खरेच घडले तर भाजपसाठी ही काळजीची आणि काॅंग्रेस आघाडीसाठी सुखावणारी घटना असेल.

नांदेड येथे काल आंबेडकर आणि ओवेसी यांची एकत्रित सभा झाली. गेले काही दिवस हे दोघे एकत्र व्यासपीठावर नव्हते. त्यामुळे आंबेडकर हे एकटेच किल्ला लढवत होते. मात्र ओवेसी काल सभेसाठी आल्याने सभा जोरदार झाली. दोघेही नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना लक्ष्य करतील, अशी चर्चा होती. कारण आंबेडकरांना आघाडीत घेण्यासाठी चव्हाण जोमाने प्रयत्न करत होते. फक्त ओवेसी यांना आघाडीत घेण्यास काॅंग्रेसचा स्पष्ट विरोध होता. आंबेडकर मात्र एमआयएमची साथ सोडणार नाही, असे ठामपणे सांगत होते. तसेच माझ्या वतीने बोलण्याचा अधिकार चव्हाणांना कोणी दिला असाही ते सवाल करत होते. त्यामुळे नांदेडच्या सभेकडे अनेकांचे लक्ष होते. प्रत्यक्षात उलटेच झाले.

काँग्रेसचे ओवेसींशी जमत नाही, असे म्हणत भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख अँड .बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने सन्मानाने जागा द्याव्यात. एमआयएमला एकही जागा नको, अशी भूमिका असदुद्दीन ओवेसी यांनी सभेत मांडली. त्यामुळे  अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ओवेसींनी काँग्रेसचे राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा थेट नामोल्लेख करत आंबेडकरांना घेण्याचे आवाहन केले. पण त्यांचा सन्मान ठेवण्याची अट विषद केली. 

ओवेसींनी सभेत  केलेले हे वक्तव्य दुहेरी असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने आंबेडकरांना आघाडीत घ्यावे आणि आपल्याला एकही जागा नको, हे वक्तव्य एमआयएमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना रुचलेले नाही. चव्हाण यांची ओवेसींना आघाडीपासून दूर ठेवण्याची खेळी यशस्वी होताना दिसत असल्याची चर्चा त्यांच्यात आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेल्या एमआयएमच्या  बँकफुटवर जाण्याच्या भूमिकेमुळे  त्या पक्षाच्या इच्छुकांत अस्वस्थता पसरली आहे. ओवेसींच्या बदललेल्या या भूमिकेमुळे  महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com