Ashok Chavan says farmers should send their cattle to Ram Shinde's house | Sarkarnama

शेतकऱयांनी शेळ्या - मेंढ्या राम शिंदेच्या घरी नेऊन सोडाव्या : अशोक चव्हाण

सरकारनामा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

.

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश  काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱयांनी चारा नसेल तर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या घरात नेऊन शेळ्या मेंढ्या सोडा असे जाहीर आवाहन केले आहे . 

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राम शिंदे हे पाथर्डी येथे आले होते. त्यावेळी एक शेतकरी शिंदे यांना भेटायला आला व दुष्काळी स्थितीमुळे चारा उपलब्ध नाही. त्यामुळे जनावरांची चाऱ्या अभावी उपासमार होत असल्याचे शेतकरी मंत्री शिंदे यांना सांगत होता. यावर त्या शेतकऱ्याला सल्ला देताना राम शिंदे यांनी त्या शेतकऱ्याला चारा नसेल तर आपली जनावरे पाहुण्याकडे नेऊन बांधा, असा  सल्ला  दिला.

सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या अशोक चव्हाण यांनी राम शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना राज्य सरकारवर टीकेचा भडीमार केला . राम शिंदे हे एक जबाबदार मंत्री असताना असे बेजबाबदार वक्तव्य कसे करू शकतात असा प्रश्न उपस्थित करून   आपल्या शेळ्या मेंढ्या खुशाल राम शिंदे यांच्या घरी शेतकऱयांनी नेऊन बांधाव्यात असा सल्ला  दिला आहे . राम शिंदे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे .असेही ते म्हणाले .  

 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राम शिंदे यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली .  ते म्हणाले, " राज्य सरकारचे मंत्री किती असंवेदनशील झाले आहेत याचा हा पुरावा आहे . दुष्काळामुळे शेतकऱयांचे अतोनात हाल होत असून चाऱ्याअभावी पशुधन कसे जगवायचे हा त्याच्या समोर प्रश्न आहे . चारा छावण्या सुरु करण्याऐवेजी अशी वक्तव्ये करून हे मंत्री शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच  करीत आहेत . मुख्यमंत्र्यानी अशा मंत्र्यांना समज द्यावी . " 

दरम्यान झालेल्या प्रकारावर भाष्य  करताना राम शिंदे म्हणाले," माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे . आलेले गृहस्थ पाथर्डी  शहरात चारा छावणी सुरु करा म्हणत होते . मी त्यांना शासनाची सध्या ग्रामीण भागात चारा छावण्या सुरु करण्याची योजना असून भविष्यात शहरी भागात या छावण्या सुरु करता येतील का याबाबत विचार करू असे मी त्यांना सांगितले . अडचण असेल तर तर आपण पाहुण्यांकडून चारा घेऊन येतो किंवा पाहुण्यांकडे आपण गुरे नेऊन सोडतो . ग्रामीण भागात ही पद्धत आहे . " 

 

संबंधित लेख