ashok chavan gives thanks to raj thackrey | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मनसे नको म्हणणाऱ्या काॅंग्रेसने राज ठाकरेंचे मानले आभार

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

काॅंग्रेसचा कालचा बंद कोणी यशस्वी केला तर याचे उत्तर हे मनसे असेच आहे. मनसे आंदोलनात उतरली नसती तर काॅंग्रेसने पुकारलेल्या बंजचा फज्जा उडाला असता. मात्र मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने बंदची तीव्रता थोडीफार वाढली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आभार काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मानले.

पुणे : कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विचारधारा एक नाही. त्यामुळे मनसेशी आघाडीचा संबंधच नसल्याचा दावा करणारे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मनसेचे आभार मानण्याची वेळ आली.

भाजपविरोधात लढायचे असेल तर मनसेने काॅंग्रेसमध्ये सहभागी व्हावे, असाही सल्ला अशोकरावांनी सरकारनामाच्या फेसबुक चर्चेत  दिला होता. तो सल्ला देऊन ४८ तास उलटायच्या आत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना दूरध्वनी लावला. काॅंग्रेसने काल (ता. १०) पुकारलेल्या बंदमध्ये मनसे सहभागी आणि बंद पार पाडण्यात प्रभावी कामगिरी केल्याबद्दल अशोकरावांनी मनसेला धन्यवाद दिले.

मनसेमुळेच राज्यात बंदची व्यापकता वाढल्याचे चव्हाण यांनी कबूल केले. त्यामुळे मनसेला दूर लोटण्याच्या तयारीत असलेल्या काॅंग्रेसला मनसेमुळेच रस्त्यावरील लढाई यशस्वी होऊ शकते, याची जाणीव झाली.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसने पुकारलेल्या बंदला मनसेने पाठिंबा देत, या बंदमध्ये कॉंग्रेसपेक्षा मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे बंदचा परिणाम जाणवला. अशोक चव्हाण यांनी राज ठाकरेंना फोन केल्याच्या वृत्ताला मनसेचे नेते बाळ नांदगावकर यांनी `सरकारनामा`शी बोलताना दुजोरा दिला.

ते म्हणाले,``हा फोन केल्यामुळे पुढील राजकीय गणिते लगेच मांडण्याचे काही कारण नाही. मात्र विरोधी पक्ष एकत्र आले तर काय घडू शकते, हा संदेश कालच्या एकीतून गेला आहे.``

नांदगावकर पुढील धोरणांविषयी काही सांगत नसले तरी विरोधकांची एकजूट हा प्रमुख मुद्दा आगामी निवडणुकीतही राहू शकतो. भाजपला गेल्या काही निवडणुकांमध्ये शहरी भागात विशेषत : मुंबई, ठाणे, पुणे, नाशकात घवघवशीत यश मिळाले. या शहरांत मनसेची ताकद आहे. याआधीच्या निवडणुकांमध्ये मनसेने याच भागातून आपले आमदार आणि सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळे मनसेची साथ मिळवून भाजप-शिवसेनेला धक्का देण्याची व्यूहरचना योग्य ठरू शकते, हे आता काॅंग्रेसच्या लक्षात आले आहे.

राज ठाकरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवून आहेत. आता काॅंग्रेसच्या नेत्यांनाही त्यांच्याशी जुळवून घेणे योग्य असल्याचे वाटत आहे. शिवसेनेवर काल अशोक चव्हाण आणि राज ठाकरे या दोघांनीही कठोर टीका केली. त्यामुळेच या मनसे आणि काॅंग्रेस पुढे कसे धोरण आखणार, याची उत्सुकता आहे.

संबंधित लेख