अशोक चव्हाण राज्यात परतणार, भोकरमधून लढण्याची शक्‍यता ?

अशोक चव्हाण राज्यात परतणार, भोकरमधून लढण्याची शक्‍यता ?

भोकर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण दिल्लीच्या राजकारणातून पुन्हा राज्यात परतण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. भोकर या आपल्या मतदारसंघातून ते आगामी निवडणूक लढवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यात परतत असतानाच नांदेड लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे कायम राखण्यासाठी आपले समर्थक व माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांना नांदेडमधून लोकसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते. 

राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने संघर्ष यात्रा काढत संपुर्ण राज्य पिंजून काढले होते. जीएसटी, नोटांबदी, वाढती महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्‍न, शेतकरी आत्महत्या, फसलेली कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव नाही, बोंडआळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत नाही यासह राज्यातील बिघडलेले जातीय सलोख्याचे वातावरण यावरून कॉंग्रेसने सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढले होते. 

प्रदेशाध्यक्ष या नात्याने अशोक चव्हाण यांनी संघर्ष यात्रेचे नेतृत्व केले होते. शिवाय गेल्यावर्षी झालेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेत कॉंग्रेसची एकहाती सत्ता आणत त्यांनी आपले वर्चस्व सिध्द केले होते. सत्ताधारी भाजप-सेना सरकारच्या विरोधातील वातावरण पाहता राज्यात सत्तांतर होणार असा अंदाज कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून केला जातोय. 

या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसकडे राज्याचे नेतृत्व सक्षमपणे पेलू शकेल असे दुसरे नेतृत्व सध्या तरी कॉंग्रेसकडे दिसत नाही. अशोक चव्हाण यांच्याकडे राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते. राज्यात पुन्हा कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी अशोक चव्हाण यांनी मरगळलेल्या कॉंग्रेसमध्ये नांदेड-वाघाळा महापालिकेतील विजयाने प्राण फुंकले होते. त्यामुळे भविष्यातील राजकीय परिस्थिती बघता अशोक चव्हाण पुन्हा राज्यात परतण्याची अधिक शक्‍यता आहे. 

अशोक चव्हाण यांना 2014 मध्ये पक्षाने नांदेड लोकसभा लढवण्यास सांगितले. तेव्हा भोकर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. देशभरात मोदी लाट असतांना अशोक चव्हाण यांनी लोकसभेसह पत्नी अमिता चव्हाण यांचा भोकर मतदारसंघही राखला होता. राज्यात सर्वत्र भाजपची विजयी घोडदौड सुरू असतांना त्याला लगाम घालण्याचे काम अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने नांदेड जिल्ह्यात केले होते. 

नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा आणि राजस्थान, मध्यप्रदेश व पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला चांगले यश मिळाले. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्षपदाची धुरा देखील राहूल गांधी यांच्या खांद्यावर आल्याने कॉंग्रेसचा आत्मविश्‍वास बळावला आहे. अशावेळी राज्यात सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदावर दावा सांगता यावा यासाठी अशोक चव्हाण यांना दिल्लीपेक्षा विधानसभा लढवण्यातच अधिक रस असल्याचे बोलले जाते. 

भोकर कॉंग्रेसचा गड 
भोकर विधानसभा मतदारसंघात 1967 ते 2014 दरम्यान अपवाद वगळता सातत्याने कॉंग्रेसला विजय मिळत आलेला आहे. दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी दोनवेळा कॉंग्रेसच्या तिकीटावर तर एकदा अपक्ष निवडणूक लढवत भोकरमधून विजय मिळवला होता. 80 व 85 मध्ये बालाजी देशमुख यांनी कॉंग्रेसचा गड कायम राखला, पुढे 90-95 मध्ये डॉ. माधव किन्हाळकर यांनी दोनदा भोकरमधून विजय मिळवत कॉंग्रेसचे वर्चस्व सिध्द केले होते. 99 मध्ये बालाजी देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवत कॉंग्रेसला हादरा दिल्यानंतर 2004 मध्ये राष्ट्रवादीने भोकरची जागा जिंकली. श्रीनिवास देशमुख यांनी तेव्हा विजय मिळवला होता. 

2009 च्या विधानसभा निवडणूकीत अशोक चव्हाण यानी भोकरमधून निवडणूक लढवत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेली जागा कॉंग्रेसकडे खेचून आणली. 2014 मध्ये अशोक चव्हाण नांदेड लोकसभा लढवणार असल्याने कॉंग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांना भोकरदनमधून उमेदवारी देऊ केली होती. पंरतु भोकर विधानसभा मतदारसंघ पंरपरेनूसार चव्हाण घराण्याकडेच राहावा यासाठी प्रयत्न करत अशोक चव्हाण यांनी ऐनवेळी पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी मिळवून देत निवडूनही आणले. अमिता चव्हाण यांना 1 लाख 781 एवढी मते मिळाली होती. भाजपच्या माधव किन्हाळकर यांचा त्यांनी 47 हजार मतांनी पराभव केला होता. 

चव्हाण विरुध्द चिखलीकर लढत होणार 
आगामी विधानसभा निवडणूकीत भोकरमध्ये अशोक चव्हाण विरुध्द प्रताप पाटील चिखलीकर अशी लढत होण्याची शक्‍यता आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर शिवसेनेचे विद्यमान आमदार असले तरी नांदेड-वाघाळा महापालिका निवडणूकीच्या वेळी त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होत असली तरी अद्याप त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात राहिले तरी त्यांची लढत अशोक चव्हाण यांच्याशीच होणार असे बोलले जाते. 

या शिवाय भाजपकडून माजीमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, जिल्हासंघटक संजय कोडगे यांच्या नावाची देखील भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com