Ashok Chavan declares Kalyan Kale's candidature | Sarkarnama

फुलंब्रीचे कल्याण करण्यासाठी 'कल्याण'च आमदार होणार : अशोक चव्हाण 

नवनाथ इधाटे 
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

कॉंग्रेसकडून कल्याण काळे यांचे नाव घेतले जात असतांना, भाजपकडून पुढच्यावेळीही मीच आमदार असणार असे खुद्द हरिभाऊ बागडे यांनीच पळशी येथील एका जाहीर कार्यक्रमात सांगून टाकले होते. बागडेंची लोकसभेत पाठवण करण्यास इच्छूक असलेल्या भाजप समर्थकांसह कॉंग्रेसच्या गोटात देखील खळबळ उडाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत पुन्हा बागडे विरुध्द काळे अशी लढत होण्याची शक्‍यता आहे.  

फुलंब्री:   फुलंब्रीच्या कल्याणासाठी आगामी निवडणुकीत 'कल्याण'च आमदार होणार अशी घोषणा करत अशोक चव्हाणांनी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तबच केले.   कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रे निमित्ताने नुकतीच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची फुलंब्री विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा झाली.

 सध्या हा मतदारसंघ भाजपकडे आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तर लोकसभेसाठी हा मतदारसंघ जालना म्हणजेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे येतो. त्यामुळे विधानसभेला ही जागा पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी कॉंग्रेसने जोर लावला आहे.

गेल्या निवडणुकीत अवघ्या साडेतीन हजार मतांनी डॉ. कल्याण काळे यांचा पराभव झाला होता. देशभरात मोदी लाट असतांनाही तेव्हा कॉंग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे या निसटत्या पराभवाची भरपाई 2019 मध्ये विजय मिळवत करण्याची तयारी कल्याण काळे यांनी वर्षभरापासूनच सुरु केली आहे . बुथ कमिटी सदस्य नेमण्यात तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघाला कॉंग्रेसच्या सोशल मिडिया टीमकडून राज्यात प्रथम येण्याचा मान देखील मिळाला. 

डॉ. कल्याण काळे आणि जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनीच जिल्ह्यातील एल्गार यात्रा आणि त्यानंतरच्या शहरातील 'कॉंग्रेस आपल्या दारी' ही मोहिम यशस्वी करून दाखवली. जनसंघर्ष यात्रेच्या समारोपापुर्वी कल्याण काळे यांच्यासाठीच फुलंब्रीत अशोक चव्हाणांची सभा घेण्यात आल्याची देखील चर्चा आहे. 

काळेंच्या चर्चेने औताडे नाराज? 
कॉंग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे हे देखील फुलंब्रीतून आगामी विधानसभा लढवण्यास इच्छूक आहेत. तशी तयारी देखील त्यांनी सुरू केली होती. पण फुलंब्रीच्या सभेतच अशोक चव्हाणांनी डॉ. कल्याण काळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याने औताडे व त्यांच्या समर्थकांचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे. 

गेल्या चार वर्षापासून माजी आमदार डॉ.कल्याण काळे व सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यातील गटबाजी तालुक्‍यात चर्चेचा विषय ठरत आली आहे. त्यामुळे विधानसभा उमेदवारीचा विषय निघाला की दोघांकडूनही दावेदारी सांगितली जाते. औताडे सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने फुलंब्रीची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण पक्षश्रेष्ठींकडून कल्याण काळे यांना झुकते माप मिळाल्याने औताडे यांच्या आशेवर पाणी फिरल्याचे बोलले जाते. 

आता पक्षाने कल्याण काळेंना उमेदवारी दिलीच तर औताडे काळे यांच्यातील गटबाजीचा फटका त्यांना बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपकडून ही जागा खेचण्यासाठी उत्सूक असलेल्या काळेंना आधी पक्षांतर्गत विरोधकांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. तरच कॉंग्रेससाठी हा विजय सोपा होऊ शकेल. 

 

संबंधित लेख