पटेलांच्या स्मारकाचे ज्यांनी उद्‌घाटन केले त्यांची वैचारिक पातळी तेवढी नाही - अशोक चव्हाण

 पटेलांच्या स्मारकाचे ज्यांनी उद्‌घाटन केले त्यांची वैचारिक पातळी तेवढी नाही - अशोक चव्हाण

औरंगाबाद : देशातील महान राष्ट्र पुरूषांचे पुतळे, स्मारक उभारण्याची आपल्याकडे परंपराच आहे. सरदार पटेलाचा जगातील सर्वात उंच पुतळा गुजरातमध्ये उभारण्यात आला, त्याचा आम्हाला अभिमानच आहे. पण ज्यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्‌घाटन झाले, त्यांची वैचारिक पातळी मात्र सरदार पटेल यांच्या इतकी नाही, किंवा त्यांच्यात ती येणारही नाही असा टोला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता लगावला. 

कॉंग्रेसच्या वतीने मराठवाड्यात काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेचा आज औरंगाबादेत समारोप होत आहे. तत्पुर्वी अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या चार वर्षातील कारभाराची चिरफाड केली. गुजरातमधील नर्मदा नदीच्या काठावर तीन हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यावरून सध्या मोदींवर टिका होत आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना अशोक चव्हाण म्हणाले, सरदार पटेलांचा भव्यदिव्य पुतळा उभारणे हे भूषणावहच आहे. त्याचा आम्हाला अभिमान देखील आहे. पण ज्यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्‌घाटन झाले त्यांची वैचारिक पातळी मात्र सरदारांएवढी निश्‍चितच नाही. 

भाजप सरकारने राज्यातील काही तालुक्‍यांमध्ये मध्यम व गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. यावर टीका करतांना दुष्काळात असा फरक करता येत नाही. हा सरकारने लावलेला जावाई शोध असल्याची टिका केली. दुष्काळ सदृश्‍य आणि पालकमंत्री अदृश्‍य अशी औरंगाबाद जिल्ह्यातील अवस्था आहे असे सांगत चव्हाणांनी पालकमंत्री डॉ. दिपक सांवत यांच्यावरही निशाणा साधला. 

औरंगाबाद लोकसभा कॉंग्रेसच लढवणार 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबाद लोकसभेची जागा लढवण्यास आम्ही इच्छूक असल्याचे सांगत हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडावा अशी मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. या संदर्भात अद्याप आमच्यात कुठलीही बोलणी झालेली नाही. औरंगाबादची जागा कॉंग्रेसची आहे आणि आम्हीच ती लढवणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे ः 
- शेतकरी कर्जमाफी योजना फसवी, फक्त पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच लाभ. बॅंकेची जुनी वसुली देखील वळती केली. 
- राज्यात केवळ 30 ते 35 टक्के एवढ्याच पीक कर्जाचे वाटप. 
- सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात 16 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या. 
- चार वर्षात सिंचनाच्या 64 हजार कोटींच्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता, पण सिंचन क्षमतेत वाढ नाही 
- जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या जेसीबीसाठीच ही योजना सुरू. न खाऊंगा न खाने दुंगा बोलण्या पुरतेच 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदूमिलमधील स्मारक, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या बाबतीत सरकार उदासीन. 
- राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा, मुख्यमंत्र्यांचे शहरच गुन्ह्यांची राजधानी ठरत आहे. 
- मराठा आरक्षण, महामंडळामार्फत कर्जवाटप आणि आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यात सरकारकडून चालढकल 
- निवडणुका संपेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा अभ्यास संपणार नाही, ते खूप अभ्यासू आहेत. 
- पिण्याचे पाणी सगळ्यांनाच मिळाले पाहिजे, पाणी प्रश्‍न महाराष्ट्रात पेटू नये 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com