मुख्यमंत्री भिडेंचे धारकरी की वारकरी : अशोक चव्हाणांचा धारदार सवाल

मराठा समाजाच्या आंदोलनावरून काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवट टीका केली आहे. मनुवादाचे समर्थन करणआऱ्या संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. मात्र मराठा समाजाच्या तरुणांना गुन्हेगार ठरवले जात आहेत. मुख्यमंत्री हे धारकरी आहेत की वारकरी, असा थेट सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री भिडेंचे धारकरी की वारकरी : अशोक चव्हाणांचा धारदार सवाल

मुंबई : लाखोंचे मोर्चे कोणतीही अनुचित घटना न घडू देता शांततामय मार्गाने काढणा-या मराठा समाजातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत, हे अतिशय संतापजनक आहे, अशी जळजळीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

औरंगाबाद जिल्ह्यात आज काकासाहेब शिंदे या तरूणाचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्देवी आणि दुःखद आहे. मराठा आंदोलकांनी संयम राखावा आणि आतापर्यंत अवलंबलेला शांततपूर्ण आंदोलनाचा मार्ग सोडू नये, असे आवाहन चव्हाण यांनी केले. शिवरायांच्या मावळ्यांपैकी अनेकांचे आईबाप वारीत आहेत. त्यांना दूषण देण्याआधी मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः वारकरी विचारांचे आहेत की धारकरी विचारांचे आहेत हे स्पष्ट करावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.  

यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, वारक-यांच्या गर्दीत साप सोडण्याचा विचार भिडेंची पिलावळ व त्यांना गुरु मानणा-यांच्यांच डोक्यात येऊ शकतो. सरकारचा विरोध करणारे हे प्रत्येकवेळी गुन्हेगार ठरवले जात आहेत. शेतक-यांनी मोर्चा काढला त्यांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. एल्गार परीषदेच्या आयोजकांना माओवादी ठरवण्याचा प्रयत्न सरकारने केला. भीमा कोरेगाव दंगलीच्या ख-या सूत्रधारांना सोडून आंदोलन करणा-या दलित बांधवांची माता भगिनींसह धरपकड करण्यात आली त्याच धर्तीवर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुंतवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे..  

वारकरी संप्रदाय आणि संतांचा अवमान करणा-या मनोहर भिडे यांचे वक्तव्य अजूनही तपासता न आलेल्या सरकारला पंढरपूरच्या वारीमध्ये घातपात घडवला जाणार आहे  असा कथित रिपोर्ट मात्र तात्काळ मिळतो, हे अचंबीत करणारे आहे. भिडे यांनी केलेले वक्तव्य हिब्रू भाषेत होते का? ज्यामुळे तपासायला एवढा वेळ लागतो आहे असा संतप्त सवाल चव्हाण यांनी केला. मनुवादी भिडेला पाठीशी घालून आंदोलक कार्यकर्त्यांना त्यांच्या शिवाजी महाराजांवरील प्रेमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा मुख्यमंत्र्यांना नैतिक अधिकार नाही, असा सवाल त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com