Ashok Chavan bypasses sattar & invites Zambad to Mumbai | Sarkarnama

सत्तारांनी झिडकारले पण अशोक चव्हाणांनी सुभाष झांबड यांना केला थेट फोन

जगदीश पानसरे 
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यांशी माझा कुठालाही वाद नाही. मी निवडून  येणार नाही हे त्यांनी कशामुळे सांगितले मला समजले नाही. पण शेवटी कुणाला निवडूण द्यायचे, कोण आपल्या सुख-दुःखात धावून येतो हे जनता ओळखून असते.

औरंगाबादः मराठवाड्यासह महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक गुरुवारी  (ता.15) मुंबईत कॉंग्रेच्या टिळकभवनात घेण्यात येणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले आणि सध्या पक्षावर नाराज असलेले आमदार सुभाष झाबंड यांना 'बैठकीला हजर राहा' असे बोलावणे थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडूनच आल्याची माहिती आहे. 

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान कॉंग्रेस आमदार सुभाष झांबड यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा पक्षाकडे यापुर्वीच्या बैठकांमध्ये केली होती. कॉंग्रेसमधील विशेषता वैजापूर तालुक्‍यातून त्यांचा नावाला मोठ्या प्रमाणात समर्थन होते. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील सुरूवातीला झांबड यांचे नाव पुढे करत पक्षाकडे तशी शिफारसही केली होती. 

पण गेल्या महिन्यात पक्ष व स्थानिक पातळीवर झालेल्या अहवालानूसार सुभाष झांबड निवडूण येऊ शकत नाही असा दावा करत सत्तार यांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. तेव्हा पासून झांबड यांनी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर जाणे टाळले होते. अगदी महाराष्ट्राचे प्रभारी मलिक्कार्जुन खारगे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाकडे देखील त्यांनी पाठ फिरवली होती. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मात्र झांबड यांनी हॉटेलात जाऊन गुप्त भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपबिती सांगत बाबांनी दिलेला सल्ला मनावर घेतल्याचे दिसते. जनसंघर्ष यात्रेत गायब झालेले झांबड पुन्हा नव्या जोमाने जिल्हाभरात कामाला लागले आहेत. दौरे आणि गाठीभेटीवर भर देत त्यांनी लोकसभा उमेदवारीवरील आपला दावा कायम ठेवल्याचे बोलले जाते. 

माझा कुणाशीही वाद नाही- सुभाष झाबंड 

" मुंबईत उद्या होणाऱ्या लोकसभा आढावा बैठकीस उपस्थित राहा असा फोन मला प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण साहेब, त्यांचे स्वीय सहायक व अन्य वरिष्ठ नेत्यांचे  आला आहे .   मध्यंतरीच्या काळात मी पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर होतो, पण आमदार म्हणून जिल्ह्यात व ग्रामीण भागात माझा संपर्क सुरूच होतो," असे  आमदार सुभाष झांबड यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले.  

" जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यांशी माझा कुठालाही वाद नाही. मी निवडून  येणार नाही हे त्यांनी कशामुळे सांगितले मला समजले नाही. पण शेवटी कुणाला निवडूण द्यायचे, कोण आपल्या सुख-दुःखात धावून येतो हे जनता ओळखून असते. "

" त्यामुळे जिल्ह्यात कुणाचे काम चांगले आहे, कोण निवडूण येऊ शकतो हे पक्षाला चांगले कळते. त्यामुळे उमेदवारी देतांना याचा नक्कीच विचार होईल. मी मात्र माझे काम आणि लोकांच्या भेटीगाठी यात मात्र कधीही खंड पडू दिलेला नाही. वरिष्ठांनी बोलावले आहे, तेव्हा उद्याच्या आढावा बैठकीला मी जाणार आहे,"  असेही झाबंड यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख