ashok chavan big boss in nanded | Sarkarnama

नांदेडच्या निवडणुकीत अशोक चव्हाणच ठरले "बिग बॉस'

जगदीश पानसरे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

गेल्या 20 वर्षात नांदेडकरांसाठी मी काय काय केले हे अशोक चव्हाण घराघरात जाऊन सांगण्यात यशस्वी ठरल्याचे आज जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट होते. निवडणुका जाहीर होताच पक्षातून बाहेर पडणाऱ्या मंडळींची दखल घेऊन ताबडतोब मलमपट्टी करत चव्हाणांनी एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर लक्ष केंद्रित केले. त्यापैकी 9 नगरसेवक कॉंग्रेसमध्ये आल्याने गेल्यावेळी एमआयएममुळे गमवावी लागलेली मुस्लिम मते पुन्हा कॉंग्रेसकडे खेचण्यात अशोक चव्हाण यशस्वी ठरले. एमआयएम अकरावरून शून्यावर आल्यामुळे ते स्पष्ट झाले आहे. 

औरंगाबाद : नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत भाजपचा "निक्काल' लावला आहे. राज्यातील आठ ते दहा मंत्री, अशोक चव्हाण विरोधकांची फौज आणि प्रचारासाठी भरपूर असा दारूगोळा घेऊन नांदेड मोहिमेवर निघालेल्या भाजपच्या हाती काहीच लागले नाही. लोकसभेप्रमाणेच नांदेडकरांनी पुन्हा एकदा खासदार अशोक चव्हाण यांच्यावर विश्‍वास दाखवत त्यांच्यावर मतांचा अक्षरश वर्षाव केला. 

"अशोकराव तुमचा किल्ला यावेळी उध्दवस्त होणार आहे' असा इशारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर मात्र त्यांचा डाव त्यांच्यावर उलटल्याची चर्चा आता नांदेड आणि राज्यभरात सुरु झाली आहे. नांदेड वाघाळा महापालिकेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून संपुर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले होते. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सुरु असलेला घोडदौड अशोक चव्हाण रोखणार का? असा प्रश्‍न सगळ्यांच्या मनात होता. 

राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा कॉंग्रेसमुक्त केल्यावर नांदेड मोहिमेसाठी देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. अर्थात त्यांच्या जोडीला शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमेप्रकाश पोकर्णा, माजी खासदार व अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्कर पाटील खातगांवकर हे देखील होतेच. त्यामुळे नांदेडची निवडणूक ही कॉंग्रेस विरुध्द इतर अशी न होता ती अशोक चव्हाण विरुध्द भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम अशी झाली. 

नांदेडची सूत्रे हाती घेताच निलंगेकरांनी लातूर पॅर्टन राबवण्यास सुरुवात केली. कॉंग्रेस, शिवसेना, एमआयएमसह राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक गळाला लावले. त्यामुळे अर्धी लढाई आपण जिंकलो या भ्रमात भाजप राहिली. अर्धी लढाई प्रचारासाठी आलेले राज्यातील आठ-दहा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या सभेने जिंकता येईल हा भाजपचा अंदाज नांदेडकरांनी फोल ठरवला. आदर्श प्रकरणापासून अशोक चव्हाण यांच्या मुंबईसह विविध ठिकाणच्या मालमत्तेची प्रकरण बोहर काढण्यात आली. भाजपकडे अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याशिवाय दुसरे काही मुद्दे नव्हते. 

गेल्या 20 वर्षात नांदेडकरांसाठी मी काय काय केले हे अशोक चव्हाण घराघरात जाऊन सांगण्यात यशस्वी ठरल्याचे आज जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट होते. निवडणुका जाहीर होताच पक्षातून बाहेर पडणाऱ्या मंडळींची दखल घेऊन ताबडतोब मलमपट्टी करत चव्हाणांनी एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर लक्ष केंद्रित केले. त्यापैकी 9 नगरसेवक कॉंग्रेसमध्ये आल्याने गेल्यावेळी एमआयएममुळे गमवावी लागलेली मुस्लिम मते पुन्हा कॉंग्रेसकडे खेचण्यात अशोक चव्हाण यशस्वी ठरले. एमआयएम अकरावरून शून्यावर आल्यामुळे ते स्पष्ट झाले आहे. 

राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या भाजप-शिवसेनेने नांदेडात स्वतंत्र लढण्याची रिस्क घेतली आणि ती त्यांच्या चांगलीच अंगलट आल्याचे दिसते. दोन नगरसेवक असलेल्या भाजपला फोडाफोडीवर विश्‍वास असल्यामुळे त्यांनी शिवसेनेला किंमत दिली नाही, तर शिवसेनेनेही भाजपवर टीका करत प्रचारातून एकमेकांचे वाभाडे काढले. शिवसेना कॉंग्रेसची बी टीम आहे असा आरोप खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केल्यामुळे सुज्ञ नांदेडकरांनी अशोक चव्हाणांवरच विश्‍वास दाखवणे पसंत केले. 

हैदराबाद मार्गे नांदेड-वाघाळा महापालिकेतून महाराष्ट्रात दाखल झालेल्या एमआयएमला अशोक चव्हाणांनीच पुन्हा परत पाठवल्याचे त्यांची झालेली वाताहत पाहून स्पष्ट होते. त्यामुळे नांदेडात शिवसेनेने हम तो डुबेंगे सनम, तुमको भी लेके डुबेंगे अशीच भूमिका भाजपच्या बाबतीत घेतल्याचे दिसते. अशोक चव्हाणांविरुध्द लढण्यासाठी जमा केलेल्या फौजेतील प्रताप पाटील चिखलीकरां सारखे अस्त्र निष्फळ ठरल्याने भाजपला दोन आकडी संख्या देखील गाठता आली नाही. पदासाठी पक्ष बदलणारे अशी चिखलीकरांची प्रतिमा झाली. त्याचा फटका देखील भाजपला बसला. 

अशोक चव्हाणांची संकल्पसिध्दी 
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी कॉंग्रेसच्या वतीने संकल्पनामा प्रसिध्द करण्यात आला होता. यावेळी अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या विकासासाठी मी या शहराची आनेरशीप स्वीकारली असल्याचे जाहीर केले होते. विरोधक तुटून पडलेले असतांना देखील अशोक चव्हाणांनी शांत डोक्‍याने सूत्र हलवत मतांचे गणित आखले. परिणामी नांदेड महापालिकेवरची सत्ता अबाधित राखण्याची अशोक चव्हाणांची संकल्पसिध्दी देखील आजच्या निकालावरून झाली असे म्हणावे लागेल. 2014 च्या मोदी लाटेत देखील अशोक चव्हाणांनी नांदेडची जागा जिंकत मोदी लाटेवर स्वार होण्याचा पराक्रम केला होता. 2017 मध्येही राज्यभरात असलेल्या मोदी लाटेला नांदेडात थोपवण्याची किमया अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने पुन्हा एकदा केल्याचे दिसते. 

संबंधित लेख