अशोक चव्हाण बागवेंचा हट्ट पूर्ण करणार!
पुढील काळात अध्यक्ष म्हणून आपल्यालाच काम करायचे असल्याची कल्पना बागवे यांना असावी. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरवात करीत सहकाऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले असावे. बागवे हे अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे बागवे यांचे शहरायक्षपद कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.
पुणे : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहेत. याचा सर्वाधिक फायदा पुण्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना होण्याची शक्यता आहे. बागवे हे चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे बागवे यांचे शहराध्यक्षपद अबाधित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील पाच वर्षे पदावर राहण्याचा बागवे यांचा हट्ट पूर्ण होणार आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालिन शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी राजीनामा दिला. त्या जागी एप्रिल 2016 ला बागवे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका झाल्या नव्हत्या. 2015 ला होणाऱ्या या निवडणुका सध्या सुरू आहेत. त्यामुळे आता होणारी शहराध्यक्षांची निवड पाच वर्षांसाठी होणार आहे. बागवे हे अशोक चव्हाण यांचे निष्ठावंत मानले जातात. शिवाय गेली सुमारे दीड वर्षे तेच अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे बागवे यांना न बदलता त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे.
पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका पूर्ण करण्याचे काम सध्या सुरू आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून प्रदेश कार्यकारिणीवर प्रतिनिधी पाठविण्याची प्रक्रिया गेल्या महिन्यात पूर्ण करण्यात आली. त्यावरून झालेल्या राजकारणात पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले.
आमदार अनंत गाडगीळ यांचे नाव प्रदेश समितीकडे पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या गाडगीळ यांनी पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आगपाखड करीत ताकद दाखविण्याचे आव्हान दिले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गाडगीळ यांनी ताकद दाखवून प्रदेश समितीत नाव समाविष्ट करून घेतले. या साऱ्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या साप्ताहिक बैठकीत बागवे यांनी पक्षांतर्गत गटबाजी थांबविण्याचे आवाहन केले.
यापुढील काळात अध्यक्ष म्हणून आपल्यालाच काम करायचे असल्याची कल्पना बागवे यांना असावी. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरवात करीत सहकाऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले असावे. बागवे हे अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे बागवे यांचे शहरायक्षपद कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे ते तातडीने कामाला लागले असून नांदेड महापालिकेतील यशानंतर पुण्यातील स्थानिक पक्ष संघटनेत नवचैतन्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गट-तट विसरून साऱ्या वरिष्ठ सहकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षाला योगदान दिले पाहिजे, असे त्यांनी साप्ताहिक बैठकीत आग्रहपूर्वक सांगितले.