Ashish shelar attacks congress and NCP on education policy | Sarkarnama

शिक्षणावर विरोधकांची कोल्हे कुई सुरू - आशिष शेलार

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा न्यूज ब्यूरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

कायम शब्द यांनीच आणला. त्यावेळी शासनाकडून अनुदान घेणार नाही, असं तुम्हीच लिहून घेतलं. 1300 शाळा बंद करण्याचा निर्णयाचा जीआर तुमच्याच काळातील आहे, म्हणजे तो 2011सालचा जीआर आहे. त्या जीआरमध्ये वीस पटसंख्यांचा मर्यादा घालत शाळा बंद करण्याचा निर्णय तुमच्याच काळातील आहे .

- आशिष शेलार 

मुंबई  : शिक्षणावर विरोधक विधानसभेत बोलत आहेत. पण त्यांची ही भूमिका म्हणजे कोल्हे कुई असल्याचा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांना लगावला. शिक्षणावरच्या प्रश्नावर विरोधी पक्षांचा नियम 293 अन्वये प्रस्तावावर विरोध नोंदवताना शेलार बोलत होते.
 

विरोधकांच्या भूमिकाला 'उलटे चोर कोतवाल को डाटे' हे मी म्हणार नाही, असा चिमटा काढत अशिष शेलार यांनी शिक्षणावरच्या प्रश्नावर विरोधी पक्षांचा नियम 293 अन्वये दाखल प्रस्तावावर आपला जोरदार विरोध नोंदवला. 

विरोधकांच्या सर्व आरोपांचे खंडण करताना आशिष शेलार म्हणाले, " गरिबांच्या शाळेबद्दल गळे काढता. पण अंबानीच्या शाळेला एमएमआरडीएचा भूखंड कोणी दिला ? त्यावेळी एमएमआरडीचे अध्यक्ष त्यावेळी तुमचेच मुख्यमंत्री होते. वंचितांच्या नावे भूखंड घ्यायचे अन् लाखोंचे श्रीखंड खायचे याला कोल्हे कोई नाही तर काय म्हणायचं ? लाखो रूपयांचे भूखंड हडप करून गरिबांच्या नावाने गळे काडायचे याला कोल्हे कुई नाही तर काय म्हणायचं ? "

" कायम विना अनुदानितच्या संदर्भात हे बोलत आहेत पण कायम शब्द यांनीच आणला. त्यावेळी शासनाकडून अनुदान घेणार नाही, असं तुम्हीच लिहून घेतलं. 1300 शाळा बंद करण्याचा निर्णयाचा जीआर तुमच्याच काळातील आहे, म्हणजे तो 2011सालचा जीआर आहे. त्या जीआरमध्ये वीस पटसंख्यांचा मर्यादा घालत शाळा बंद करण्याचा निर्णय तुमच्याच काळातील आहे ," असा  टोला अशिष शेलार यांनी विरोधकांना लगावला. 

त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. शेलाराच्या मुद्द्यावर हरकत घेत काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, " आम्ही शिक्षणाचा हक्क कायदा आणला. कुणालाही शिक्षणांपासून वंचित ठेवलं नाही. आमच्या काळात आम्ही एकही शाळा बंद केली नाही . " 

त्यावर प्रतिवाद करताना पटसंख्येचा मर्यादा घालणारा जीआर हा तुमच्याच काळातील असल्याचा पुनरुच्चार आशिष शेलार यांनी केला. यावर विरोधी बाकावरून जोरदार आक्षेप घेतला गेला. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उद्या सभागृहात तो जीआर सादर करतो ,असं सांगत वादावर पडदा टाकला.

आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले, " मुंबई महापालिकेचे शिक्षणाचे बजेट हजारो कोटींचे आहे. मात्र, त्याठिकाणी गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळत नाही. त्यामुळे त्याठिकाणीच्या शिक्षणाची श्वेत पत्रिका काढायला हवी. मुंबईतील शाळेतील शिक्षणाच्या दर्जाबाबत लक्ष द्यायला हवे. त्याठिकाणी मिळणाऱ्या सुविधा आणि गुणवत्तेची श्वेत पत्रिका काढाव्यात . " 

संबंधित लेख