ashish deshmukh says give reservation to muslim | Sarkarnama

भाजपमुळे मुस्लिम शैक्षणिक आरक्षणापासून वंचित, आशीष देशमुखांचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

नागपूर : राज्यात मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण लागू करण्याला उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मुसलमान समाजाला शैक्षणिक आरक्षण लागू केले नाही, असा आरोप भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केला आहे. भाजपच्या आमदाराने हा आरोप केल्यामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर : राज्यात मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण लागू करण्याला उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मुसलमान समाजाला शैक्षणिक आरक्षण लागू केले नाही, असा आरोप भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केला आहे. भाजपच्या आमदाराने हा आरोप केल्यामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

आमदार आशीष देशमुख यांनी काटोल येथे "काटोल फेस्टिवल' आयोजित केला आहे. या कार्यक्रमात "मजलिस-ए-मुस्लेमिन' कार्यक्रम आयोजित केला होता. यात मुस्लिम समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक बाबींवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना देशमुख यांनी भाजपच्या नेतृत्वावरच टीका केली. यावेळी त्यांनी आघाडी सरकारने मुस्लिमांना आरक्षण लागू होते, असा दाखल देऊन या सरकारची एकप्रकारे प्रशंसा केली. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला नोकरी व शैक्षणिक आरक्षण दिले होते. त्यापैकी उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाचे नोकरीतील आरक्षण रद्दबातल ठरविले परंतु शैक्षणिक आरक्षण मुस्लिम समाजाला लागू करण्याला संमती दिली आहे. आघाडी सरकारच्या या निर्णयाची देशमुख यांनी भलामण केली आहे. 

यूपीए सरकारने मुसलमांनाच्या सुधारण्यांसाठी सच्चर आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी सुद्धा केंद्र सरकारने केली, याकडे आमदार देशमुख यांनी लक्ष वेधले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप-शिवसेना सरकारने मुस्लिम आरक्षणाचा कायदा न केल्याने मुस्लिम समाज शैक्षणिक आरक्षणापासून वंचित राहिल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला आहे. 

यापूर्वी आमदार आशीष देशमुख यांनी भाजपवर स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून वार केला होता. यासाठी आमदार देशमुख यांनी सात पानांचे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविले होते. या पत्राचे अद्यापपर्यंत उत्तर मिळाले नाही. देशमुख यांनी रेशीमबागेत भाजपच्या आमदारांसाठी आयोजित केलेल्या अभ्यास वर्गाला गैरहजर राहिल्याने पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. या नोटीसला त्यांनी अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर दिलेले नाही. आता मुस्लिम आरक्षणावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे बोलले जात आहे. 

संबंधित लेख