`तीन लाखांच्या फरकाने निवडून येणाऱ्या खासदाराला आशा बुचके पराभूत करू शकते!!`

`तीन लाखांच्या फरकाने निवडून येणाऱ्या खासदाराला आशा बुचके पराभूत करू शकते!!`

पिंपरी : ``तीन लाख मतांच्या फरकांनी निवडून येणाऱ्या खासदाराला आशाताई पाडू शकते, एवढी तिची ताकद आहे. हेच विशेष आहे,`` अशी उपरोधिक प्रतिक्रिया पक्षविरोधी कारवाया (म्हणजे लोकसभा निवडणुकीत शिरूरचे उमदेवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरुद्ध काम) केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पुणे जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके यांनी आज `सरकारनामा`ला दिली. आढळराव यांच्या शिफारशीवरूनच आपल्याला पक्षातून काढून टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

``मी विधानसभा निवडणुकीत दोन पराभव पचवले असून, आढळरावांना,मात्र तो एक सुद्धा पचविता आला नाही, असेही तिखटपणे बुचके म्हणाल्या. ``बाळासाहेब दांगटांचा 2004 मध्ये पराभव झाला. त्याचवेळी अशी कारवाई झाली असती,तर ते बाहेर गेले नसते, असे सांगत आपल्याविरुद्धची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला. आढळराव हे 2014 च्या निवडणुकीत तीन लाखांहून अधिक मतांनी निवडून आले होते. 2019 मध्ये मात्र त्यांचा 60 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. 

पुढे काय करायचे कुठल्या पक्षात जायचे वा कसे याचा निर्णय माझे शिवसैनिक व पदाधिकारीच घेतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच पक्षप्रमुखांना कारवाईचा फेरविचार करण्याची विनंती करायची की कसे हे सुद्धा तेच ठरवितील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कारवाईमुळे जुन्नरमधून आगामी विधानसभा लढण्याचा बुचके व स्थानिक आमदार शरद सोनवणे यांचाही मार्ग आता मोकळा झाला आहे. या उमेदवारीची अट टाकूनच मनसेचे राज्यातील एकमेव आमदार असलेल्या सोनवणेंनी शिवसेनेत लोकसभेच्या तोंडावर प्रवेश केला होता. दुसरीकडे बुचके यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व शाबीत राहणार असले,तरी त्यांचे शिवसेनेचे गटनेतेपद जाणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीच्या चौकाराच्या तयारीत असलेल्या आढळरावांचा पराभव झाल्याने व ते उपनेते होताच लगेच हा कारवाईचा आसूड उगारण्यात आला आहे. ज्या चार विधानसभा मतदारसंघात ते पिछाडीवर राहिले, तेथील तालुकाप्रमुखांनाही नारळ देण्यात आला आहे. हाच निकष बुचके यांनाही लावला गेला आहे. तर, जिल्हाप्रमुख (शिरूर) म्हणून राम गावडेंवर सुद्धा हे हत्यार चालवावे लागले आहे. आगामी विधानसभेचे गणित आणि आडाखेही त्यामागे असल्याचे समजते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com