arvind pawar arrest story | Sarkarnama

मेहेरबानीने मिळालेल्या आश्रमशाळेतच शिवसेनेचा माजी तालुकाप्रमुख मुलींना करत होता उद्ववस्त!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

युती शासनाच्या काळात 1996 मध्ये आश्रमशाळेस मान्यता मिळाली.

कुरळप (सांगली) : येथील निनाई आश्रमशाळेचे संस्थापक अरविंद आबा पवार (वय 61, रा. मांगले, ता. शिराळा) याला बुधवारी शाळेतील अल्पवयीन आठ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.  

कुरळप पोलिसांनी निनावी पत्राची गंभीर दखल घेत या प्रकरणाचा छडा लावला. पवार याला या घृणास्पद कृत्यात मदत करणाऱ्या स्वयंपाकीण मनीषा शशिकांत कांबळे (वय 45, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. काही वर्षांपासून आश्रमशाळांच्या गैरकारभाराचे वाभाडे निघत असताना या प्रकाराने शैक्षणिक क्षेत्राला पुरता काळिमा फासला गेला आहे. 

1990 मध्ये अरविंद पवार शिवसेनेचा शिराळा तालुकाप्रमुख होता. युती शासनाच्या काळात 1996 मध्ये आश्रमशाळेस मान्यता मिळाली. पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गात येथे साडेसहाशेंवर विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकतात. बहुतांश विद्यार्थी निवासी आहेत. त्यात मुलीही आहेत. गतवर्षी इथल्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे ही शाळा राज्यभर चर्चेत आली. निवासी आश्रमशाळेचे प्रश्‍नही ऐरणीवर आले. मात्र प्रशासनाने या विद्यार्थ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत प्रकरण दडपले.

यापूर्वी शाळेतील शिपाई संस्थापकाच्या मांगलेतील शेतात वृक्षतोड करताना मृत्युमुखी पडला. ते प्रकरणही आर्थिक तडजोडीने दडपले. त्यानंतर शाळेचा विद्यार्थी गणेश विसर्जनाच्या दरम्यान ट्रॅक्‍टरच्या चाकाखाली सापडून मयत झाला. याबाबतही फार काही झाले नाही. सारे काही पैशाने मिटवता येते, असा आत्मविश्‍वासच या साऱ्या घटनांनी त्याला दिला. त्याने शाळेतील काही मुलींना मांगलेतील घरकामासाठी नेल्याची चर्चा आहे. गरीब वंचित कुटुंबांतील ही सारी मुले राज्याच्या अनेक भागातून आली आहे. त्यांच्या या असहायतेचा फायदा त्याने वेळोवेळी घेतला.  

संबंधित लेख