Arun Gavli Passes Mahatma Gandhi Thoughts Exam | Sarkarnama

'डॅडी' गांधीगिरीत अव्वल! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर आणि मुंबई सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या कारागृहातील कैद्यांसाठी गांधी विचार या विषयावर परीक्षा घेण्यात आली होती.

नागपूर : एकेकाळी आपल्या दहशतीने मुंबईवर अधिराज्य गाजविणारा कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ 'डॅडी'ने महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचाराचा अभ्यास केला असून मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या 'गांधी विचार' परीक्षेत त्याने सहभाग नोंदवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर आणि मुंबई सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या कारागृहातील कैद्यांसाठी गांधी विचार या विषयावर परीक्षा घेण्यात आली होती. मुंबईवर अरुण गवळी याचे एकछत्री अंमल राहिला. 'दगडी चाळ' येथून आपले अधिराज्य गाजविणाऱ्या 'डॅडी'ची संपूर्ण अंडरवर्ल्डमध्ये आजही ती दहशत कायम असल्याचे बोलले जाते. मुंबईत एका नगरसेवकाच्या हत्याकांडात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या तो जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे.

मध्यवर्ती कारागृहात दरवर्षी सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर यांच्या माध्यमातून 80 गुणांची गांधी विचार परीक्षा घेण्यात येते. यावर्षीही या परीक्षेत 160 कैद्यांनी सहभाग घेतला. त्यात अरुण गवळी याने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे यात 'जेल ब्रेक' प्रकरणातील कैद्यांचाही समावेश होता. 'डॅडी'सह इतर दोन कैद्यांना द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक कारागृह अधीक्षक राणी भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. परीक्षेतील इतर सर्व बंदिवानांना खादी वस्त्र आणि प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. या वेळी वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद कांदे, कारागृहातील शिक्षक योगेश पाटील, सहयोग ट्रस्टचे रवींद्र भुसारी, अॅड. स्मिता सिंगलकर, संदेश सिंगलकर, जुईली भुसारी, कारागृहाचे संजीव हटवादे आणि लक्ष्मण साळवे उपस्थित होते.

 

संबंधित लेख