arrest Sanatan chief Jayant Athavle : Radhakrishna vikhe | Sarkarnama

सनातनचे प्रमुख डॉ.जयंत आठवलेंना अटक करा: राधाकृष्ण विखे पाटील 

संजय मिस्कीन
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

कार्यपद्धती 'अल कायदा'सारखीच!

या संघटनांचे काम 'अल कायदा' सारख्या दहशतवादी संघटनांच्या तोडीस तोड अशा गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. प्रत्यक्ष हल्ला करणारे निराळे, त्यांना शस्त्रे देणारे निराळे, हत्येची योजना आखणारे निराळे, आणि कोणाची हत्या करायची, हे ठरविणारेही निराळेच आहेत. प्रत्येकाला त्याची जबाबदारी ठरवून दिलेली असते व त्यापलिकडे त्याला इतर काहीच माहिती नसते. त्यामुळेच डॉ. दाभोलकर व कॉम्रेड पानसरेंच्या हत्या प्रकरणात अनेकांना अटक झाल्यानंतरही आजवर संपूर्ण कट उघडकीस येऊ शकलेला नाही. 

मुंबई : महाराष्ट्र व कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

आज पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते. डॉ. दाभोलकरांसारख्या विचारवंतांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर आज पोलिसांच्या ताब्यात असले तरी सुमारे 500 तरूणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले असून, ते अजूनही मोकाट आहेत. त्यांना शोधून काढायचे असेल तर पोलिसांनी डॉ. जयंत आठवले यांना ताब्यात घ्या. असे विखे पाटील म्हणाले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, प्रोफेसर एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या चारही हत्याकांडात सातत्याने सनातनचे नाव घेतले जाते. पण या संघटनेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले गप्प का आहेत? त्यांच्याऐवजी त्यांचे दुसऱ्या अन्‌ तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते समोर येऊन खुलासे का करीत आहेत? असे प्रश्नही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केले.महाराष्ट्र एटीएसने मागील दोन आठवड्यांमध्ये केलेल्या कारवाईचे खरे श्रेय कर्नाटक एटीएसला आहे. गौरी लंकेश हत्याकांडाचा तपास करताना त्यांनी अनेक गोष्टींचा छडा लावला आणि त्यातूनच महाराष्ट्रातील हे कट्टरवादी "नेटवर्क' समोर आले. अन्यथा वैभव राऊतचे बॉम्ब फुटेपर्यंत राज्य सरकारला महाराष्ट्रात काय सुरू आहे, याचा पत्ता लागला नसता, अशी बोचरी टीकाही विखे यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख