Arjun Khotkar challenging Raosaheb Danve | Sarkarnama

महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने खोतकारांनी रावसाहेब दानवेंच्या विरोधात पुन्हा ठोकला शड्डू 

जगदीश पानसरे 
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी लाल मातीच्या आखाड्यात राज्यभरातून आलेल्या पहिलवांनाची झुंज लावली.

औरंगाबादः महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी लाल मातीच्या आखाड्यात राज्यभरातून आलेल्या पहिलवांनाची झुंज लावली. तर दुसरीकडे जिल्ह्यातील राजकारणाच्या आखाड्यात आपले कट्टर प्रतिस्पर्धी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात देखील पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. कुस्ती स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेतून दानवे-पिता पुत्रांचे नाव वगळत खोतकर यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात पहिलवान अंगावर लाल माती घेत प्रतिस्पर्ध्यांना लोळवण्यासाठी जान की बाजी लावणार आहेत. अर्जून खोतकर यांनी या कुस्ती स्पर्धेचे संयोजक पद स्वीकारत जय्यत तयारी केली. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी फिल्मी हस्ती, क्रिकेटपटू व राजकारणातील मंडळींना देखील आमंत्रित केले. या स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिका व वर्तमानपत्रांमधून मोठ्या जाहिराती देखील देण्यात आल्या आहेत. 

हे करत असतांना अर्जुन खोतकर यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी खासदार रावसाहेब दानवे व त्यांचे आमदार पुत्र संतोष दानवे यांची नावे मात्र वगळण्यात आली आहेत. निमंत्रण पत्रिका आणि जाहीरातींवर नजर टाकली तर अगदी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, राजेश टोपे, सिल्लोड-सोयगांवचे कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार, भाजपचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह राज्यातील अनेक राजकीय पक्षांचे मंत्री, नेते, आजी माजी आमदारांसह तब्बल पन्नास जणांची नावे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. 

परंतु ज्या जालना शहरात व लोकसभा मतदारसंघात या कुस्ती स्पर्धा होत आहेत, त्या मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे, भोकरदन-जाफ्राबादचे आमदार संतोष दानवे यांची नावे मात्र निमंत्रण पत्रिकेतून गाळण्यात आली. यावरून खोतकर-दानवे यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला असल्याचे स्पष्ट होते. 

आगामी लोकसभा निवडणुकीत युती होवो अथवा न होवो रावसाहेब दानवेंच्या विरोधात जालन्यातून निवडणूक लढवणार असल्याचे अर्जून खोतकर यांनी आधीच जाहीर केले आहे. नुकत्याच झालेल्या पाच पैकी तीन राज्यात भाजपची सत्ता गेली. परिणामी स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपने शिवसेनेशी युती करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू झाले आहेत. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांनीच मुंबईत तसे संकेतही दिले. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील शिवसेनेशी युती होणार असल्याचा राग आळवायला सुरूवात केली आहे. पण त्याचा काहीही परिणाम अर्जून खोतकर यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर झालेला नाही हे त्यांनी निमंत्रण पत्रिकेतून दानवे पिता-पुत्रांचे नाव वगळून दाखवून दिले आहे. 

युती झाली तरी दानवेंशी मैत्रीपुर्ण लढत देण्याची आपली इच्छा खोतकर यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे बोलवून दाखवल्याचे त्यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने अर्जून खोतकर यांनी दानवेंवर केलेली राजकीय कुरघोडी महत्वाची समजली जाते. 

दोन दिवस जालन्यात महाराष्ट्रातून आलेले कुस्तीपटू लाल मातीत एकमेकांना चीतपट देतांना दिसणार आहेत. तर दुसरीकडे राजकारणाच्या आखाड्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यांला धोबीपछाड देण्यासाठी खोतकरांनी देखील आपल्या अंगाला लाल माती लावून घेतल्याचे दिसून आले आहे.  पण अंगाला तेल लावलेले रावसाहेब दानवे आताच खोतकरांचे आव्हान स्वीकारायला आणि त्यांना महत्व द्यायलाही तयार नाहीत असे दिसते . 

संबंधित लेख