appointment of mhada chairman | Sarkarnama

समरजितसिंह घाटगे "म्हाडा'चे अध्यक्ष 

सररकारनामा ब्युरो 
मंगळवार, 11 एप्रिल 2017

श्री. घाटगे यांच्यारूपाने जिल्ह्याला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. या नियुक्तीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह आमदार सुरेश हाळवणकर यांनी ताकद लावली होती. श्री. घाटगे यांची स्वच्छ प्रतिमा व त्यांच्या नेतृत्त्वाखालील संस्थांचा पारदर्शी व उत्कृष्ठ कारभार हेही हे पद देण्यामागचे मुख्य कारण ठरले आहे. 

कोल्हापूर : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी "शाहू-कागल'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीने कागल तालुक्‍याला गेल्या काही महिन्यापासून लागून राहीलेली लाल दिव्याची प्रतिक्षा संपली. श्री. घाटगे यांची ही निवड तीन वर्षासाठी असेल. 

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर श्री. घाटगे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना या पदावर नियुक्तीचे आश्‍वासन दिले होते. नगरपालिका निवडणुका संपल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि तीही प्रक्रिया संपली पण श्री. घाटगे यांची निवड झाली नव्हती. त्यामुळे एकप्रकारची हुरहुर
त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना लागून राहीली होती. नगरपालिका निवडणुकीत कागल नगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदा श्री. घाटगे यांच्या नेतृत्त्वाखाली "कमळ' चिन्हावर 20 पैकी 9 नगरसेवक विजयी झाले होते. त्यानंतरच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही पाचपैकी दोन गटात भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. जिल्हा परिषदेत एकही जागा त्यांना जिंकला आली नसली तरी तालुक्‍यात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवण्यात त्यांच्या गटाला यश आले होते. 

तालुक्‍यातील भाजपची ही घोडदौड एकीकडे सुरू असताना श्री. घाटगे यांनी वर्णी कधी लागणार याकडे तालुक्‍यासह जिल्ह्याच्या नजरा होत्या. सोमवारी सकाळी
यासंदर्भातील आदेश शासनाचे अवर सचिव गणेश जाधव यांनी काढले. पुर्वी या पदावर अंकुश काकडे होते, त्यांची मुदत 2014 सालीच संपली. त्यानंतर हे पद रिक्तच होते. श्री. घाटगे यांची या पदावरील नियुक्ती ही तीन वर्षासाठी असेल असे या आदेशात म्हटले आहे. राज्यात "म्हाडा' चे सात विभाग आहेत. यापैकी तीन विभाग हे मुंबईतच आहेत. पुणे, मराठवाडा, विदर्भ व कोकण असे चार अन्य विभाग आहेत. पुणे "म्हाडा' अंतर्गत कोल्हापूरसह सोलापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे. कमी किंमतीत दर्जेदार घरे बनवून घेणे व त्याचे वाटप हे मुख्यः म्हाडाचे काम आहे. 

 

संबंधित लेख