डॉ. भामरेंनी राफेल प्रकरणात राजीनामा देऊन माझ्याविरुद्ध महापौरपदाची  निवडणूक लढवावी : अनिल गोटे 

धुळे शहराच्या कल्याणासाठी आमदारकीचा राजीनामा देतोय. डॉ. भामरेंनीही राफेल प्रकरणात राजीनामा देऊन महापौरपदासाठी निवडणूक लढवावी, पाहिजे तर पक्षाचे चिन्हावर उभे राहावे. -अनिल गोटे
gote-vs-Bhamre.
gote-vs-Bhamre.

धुळे : " माझ्यावर देशद्रोहाचा कोणताही गुन्हा नाही, तेलगी प्रकरणात वकील न लावता तुरुंगाबाहेर आलो. या प्रकरणी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना अपूर्ण ज्ञान आहे," असे प्रत्त्युत्तर  आमदार अनिल गोटे यांनी सुभाष भामरेंना आज पत्रकार परिषदेत  दिले.

धुळे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे आमदार अनिल गोटे व भाजपचे नेते, मंत्री डॉ. सुभाष भामरे, अन्य पदाधिकारी यांच्यात निवडणुकीचे पक्षीय नेतृत्व, पक्ष प्रवेश, निष्ठावंतांची उमेदवारी या मुद्यावरून संघर्ष सुरू आहे. यात मराठा कार्डच्या वापरामुळे भामरे खासदार, मंत्री झाल्याचा आरोप गोटे यांनी केलेला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर डॉ. भामरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमदार गोटेंच्या आरोपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. याला लगेचच प्रतिउत्तरे देण्यासाठी आमदार गोटे यांनी कल्याण भवनात पत्रकार परिषद घेतली. 

डॉ. भामरेंनी उपस्थित केलेल्या तेलगीच्या बनावट मुद्रांक शुल्क घोटाळ्यात गोटेंवर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल असल्याबाबतच्या मुद्‌द्‌यावर गोटे म्हणाले, " या प्रकरणात माझ्यावर कोणताही देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही. वकील न लावता व स्वतः युक्तिवाद करून मी तुरुंगाबाहेर आलो आहे. याबाबत डॉ. भामरेंचे अपूर्ण ज्ञान आहे. "

"गुंडगिरी प्रश्‍नी भामरे यांनी ज्यांना पक्षात घेतले ते संत आहेत का," असा प्रतिसवाल गोटे यांनी केला. ते म्हणाले ,"अनेकजणांवर किती गुन्हे दाखल आहेत याची कागदपत्रेही आपल्याकडे आहेत .   राजकारणाचे गुन्हेगारीकरणाच्या विरोधात गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती. ते आज असते तर गुंडांना पक्षात घेण्याचे धाडस केले असते का? "

आजी- माजी आमदारामुळे गुंडगिरी वाढल्याच्या आरोपावर गोटेंनी आपण जन्मात गुंडांना प्रवेश देणार नाही व  गुंडांचे समर्थन करत नाही, असे सांगून श्री. गोटे पुढे म्हणाले ," शहर गुंडगिरीमुक्त करण्याच्या मुद्‌द्‌यावर आपण डॉ. भामरेंना तोंडावर तुमची ताकद नसल्याचे म्हटले होते. माझा पक्षप्रवेशाला नाही तर गुंडांच्या शुद्धीकरणाला विरोध आहे . साडेनऊ हजार कोटींच्या मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाच्या प्रकल्पातील कामासाठी किमान दहा टक्के (साडेनऊशे कोटी) तरतूद असल्याशिवाय निविदा काढता येत नाही, यांनी फक्त 47 कोटीची निविदा काढली आहे, तीही कुणी भरलेले नाही ."

" धुळे शहराच्या कल्याणासाठी आमदारकीचा राजीनामा देतोय. डॉ. भामरेंनीही राफेल प्रकरणात राजीनामा देऊन महापौरपदासाठी निवडणूक लढवावी, पाहिजे तर पक्षाचे चिन्हावर उभे राहावे", असे आव्हान गोटेंनी सुभाष भामरेंना दिले. 

धुळे महापालिका निवडणुकीत आपण घेतलेली भूमिका व त्या अनुषंगाने विविध घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाकडून काही चर्चा झाली का या प्रश्‍नावर गोटेंनी "माझी पक्षाने दखल घेतलेली नाही, मला काही बोलावणं आलेलं नाही", असे उत्तर दिले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com