Angry Maratha agitation workers encircle minister Bawankule | Sarkarnama

संतप्त मराठा आंदोलकांचा उर्जामंत्री बावनकुळेंना घेराव 

सरकारनामा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

महाल भागातील नगरभवनात काही मराठा आंदोलकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घातला. आंदोलक संतप्त झाल्याने उर्जामंत्री बावनकुळे पोलिसांच्या मदतीने तेथून कसेबसे बाहेर पडले . 

 

नागपूर :  उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आज मराठा आंदोलकांच्या असंतोषाचा सामना करावा लागला. महाल भागातील नगरभवनात काही मराठा आंदोलकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घातला. आंदोलक संतप्त झाल्याने उर्जामंत्री बावनकुळे पोलिसांच्या मदतीने तेथून कसेबसे बाहेर पडले . 

नागपुरातील महाल भागातील मराठा आंदोलक एकत्रित आले होते. या भागातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाआरती करण्यात आली होती. या परिसरातील महापालिकेच्या नगरभवनात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. नागपुरातील संभाव्य पाणी टंचाईच्या संदर्भात ही बैठक होती. या नगरभवनाच्या जवळच नागपूरकर भोसले मुधोजी राजे भोसले यांचा राजवाडाही आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व मुधोजी राजे भोसले करीत आहेत. 

पालकमंत्री बावनकुळे नगरभवनात आल्याचे आंदोलकांना कळल्यानंतर काही आंदोलक भगवे झेंडे घेऊन नगरभवनात धडकले. यावेळी बावनकुळे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बाहेर निघत होते. याचवेळी संतप्त मराठा आंदोलक तेथे आले व "मराठा आरक्षण केव्हा देणार?'', अशी विचारणा करू लागले. बावनकुळे यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक संतप्त झाले होते. त्यांचे समाधान न झाल्याने काही आंदोलकांनी पालकमंत्र्यांना घेराव घातला. आंदोलन जास्त संतप्त झालेले असल्याने परंतु पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आंदोलकांना पांगविण्यात यशस्वी झाले. तेथून उर्जामंत्री बावनकुळे यांनी सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले.

संबंधित लेख