आनंदराव देवकते : गरिबीशी टक्कर देत संघर्षातून घडलेले नेतृत्व 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आनंदराव नारायण देवकते यांच्या निधनामुळे सोलापूर कॉंग्रेससह सर्वच पक्षांना एक रितेपणा जाणवत आहे. कार्यकर्त्यांचा आधारवड आणि मार्गदर्शक हरपला आहे. दक्षिण सोलापूर तालुका राजकीयदृष्ट्या पोरका झाला आहे. गेल्या चार दशकांची दक्षिण सोलापूरची `राजकीय गुरुकिल्ली' हरवली आहे!
आनंदराव देवकते : गरिबीशी टक्कर देत संघर्षातून घडलेले नेतृत्व 

1978. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं वर्ष. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी उठल्यानंतर झालेली निवडणूक, हे या निवडणुकीचं प्रमुख वैशिष्ट्य. इंदिरा गांधींबद्दल लोकांमध्ये प्रचंड रोष, संताप आणि चीड असलेले हे वर्ष. त्यामुळं साहजिकच विधानसभा निवडणुकीत जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळवल्या. इंदिरा कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर गेली. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच विधानसभेमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. या त्रिशंकू विधानसभेत सोलापूर जिल्ह्यातून इंदिरा कॉंग्रेसच्या तिकिटावर एक नवा चेहरा निवडून आला होता. महाराष्ट्राच्या सीमेवरच्या दक्षिण सोलापूर या कन्नड-मराठी मिश्रित असलेल्या मतदारसंघातून हा चेहरा निवडला गेला होता. नाव... आनंदराव नारायण देवकते. एका नव्या नेत्याचा उदय झाला होता. 

आनंदराव देवकते यांनी 1980 ची निवडणूक वगळता 1999 पर्यंत सलग विजय मिळवला. ते पाच वेळा आमदार झाले. राजूरचे सरपंच ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास. दक्षिण सोलापूरच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आनंदराव देवकते सातत्याने राहिले. `दक्षिण सोलापूरची राजकीय गुरुकिल्ली' म्हणूनच पुढे त्यांचा उल्लेख होऊ लागला. 

जनता पार्टीची लाट असतानाही 1978 मध्ये मतदारांनी आनंदराव देवकते यांच्यावर विश्‍वास टाकला होता. त्याचं कारण आनंदराव देवकते मतदारांना आपल्या घरातीलच वाटायचे. शेवटच्या क्षणापर्यंत ते कधी राजकारणी वाटलेच नाहीत. गरिबीशी टक्कर देत राजकीय संघर्षातून त्यांचे नेतृत्व उभे राहिले होते. काम केल्याशिवाय पोट भरत नव्हते, अशा परिस्थितीशी लढत त्यांनी आपल्या राजकीय-सामाजिक कार्याला सुरवात केली होती. दक्षिण सोलापूरमधील लोकांसाठी शेतगड्यासारख्या हालअपेष्टा सहन करीत त्यांनी कामे केली. कोणाकडून चहाचीही अपेक्षा ठेवली नाही. त्यांच्या या निरपेक्ष कामाची पोच त्यांना मतदार नेहमीच देत आले. मतदारांनी त्यांना कधी नाकारले नाही. तळागाळातील समाजाच्या प्रश्‍नांसाठी सतत कामाचा त्यांचा ध्यास वाखाणण्याजोगा होता. त्यामुळेच `जनसामान्यांचा नेता' अशीच त्यांची प्रतिमा बनली. सामाजिक समतेची आणि तत्त्वाची लढाई कधी सोडली नाही. जमिनीशी घट्ट नाते असलेल्या आनंदराव देवकते यांची दुग्धविकास आणि मत्स्यविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून 1999 मध्ये वर्णी लागली. `महानंद'चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. मंत्रिपदी विराजमान झाल्यावरही त्यांच्यातील साधेपणा लोकांनी अनुभवला. लाल दिव्याच्या गाडीत बसले, तरी त्यांनी त्यांच्यातील `गांधीवादी कार्यकर्त्याला' कधी संपू दिले नाही. 

`आनंदराव देवकते यांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून केलेले काम कोणीच विसरू शकत नाही,' अशी आठवण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एका कार्यक्रमात सांगितली होती. पाणीप्रश्‍नावर देवकते नेहमीच पहाडी आवाजात धारदार आणि रोखठोक बोलायचे. दक्षिण सोलापूरमधील दुष्काळाला तोंड देण्यासाठी त्यांनी तालुक्‍यात सीना आणि भीमा नदीवर बंधारे बांधले. पाण्याच्या प्रश्‍नावरून ते सरकारशी नेहमीच दोन हात करायचे. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पाणीप्रश्‍न पेटण्याच्या स्थितीत होता. अशा वेळी उजनीचे पाणी बारमाही ऐवजी आठमाही करण्यासाठी देवकते यांनी आवाज उठवला. त्यामुळे शंकरराव चव्हाण यांनी पाण्याच्या आठमाही धोरणाला मंजुरी दिली. हा क्षण त्यांच्या जीवनातील सर्वांत आनंददायी होता. 

आनंदराव देवकते यांच्यावर कॉंग्रेसने 2005 मध्ये सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली. त्यावेळी सोलापूर शहर-जिल्हा कॉंग्रेसवर सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाची गडद छाया होती. पराभूत मानसिकतेतून कार्यकर्त्यांना बाहेर काढणे आणि नव्याने उभारी देणे गरजेचे होते. ते काम आनंदराव देवकते यांनी लीलया केले. `कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आत्मचिंतनाची गरज आहे,' असे स्पष्ट सांगत त्यांनी सर्वांनाच विचार करायला भाग पाडले. त्यानंतर कॉंग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. 

2003. सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय अवकाशात सुवर्णाक्षरांनी लिहावे, असे हे वर्ष. कारण या वर्षी कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्रिपदी, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील उप मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. दोघेही सोलापूर जिल्ह्यातीलच. आनंदराव देवकते यांच्या राजकीय जीवनातही हेच वर्ष महत्त्वाचे ठरले. कॉंग्रेसमधील त्यागाची परंपरा जोपासत त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी दक्षिण सोलापूरच्या आमदारपदाचा राजीनामा दिला. या मतदारसंघातून शिंदे भरघोस मतांनी निवडून आले. त्याचवर्षी झालेल्या सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी देवकते यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. त्यांची लढाई भाजपचे प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याशी झाली. त्यात देवकतेंना पराभवाला सामोरे जावे लागले. एकीकडे त्यागाच्या भावनेने मानसिक समाधान मिळत होते, तर दुसरीकडे पराजयाची सल मनाला बोचत होती. अशा मानसिक हिंदोळ्यावर असलेल्या देवकते यांच्या राजकीय जीवनाला ओहोटी लागली ती लागलीच. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर देवकते यांना पुन्हा राजकारणाच्या पटावर आपला जम बसवता आलाच नाही. देवकते यांनी केलेल्या त्यागाचे सर्वत्र कौतुक झाले. खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनीही देवकते यांच्या त्यागाचा उल्लेख `स्वातंत्र्यानंतरच्या कॉंग्रेसच्या नेत्यांमधील त्यागी नेतृत्व' असा वारंवार केला. परंतु, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात देवकतेंचा टिकाव लागला नाही. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडून आले. मात्र, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकली नाही. आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी त्यांना बसवण्यात आले. त्यामुळे दक्षिण सोलापूरची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत देवकते यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. केवळ त्यांच्या नावाची चर्चा झाली आणि विरली. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे कॉंग्रेसकडूनच दुर्लक्षित झालेल्या देवकतेंचा राजकीय आलेख आणखीनच खालावला. 

कॉंग्रेसकडून डावलले गेल्याने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी 2014 मध्ये आनंदराव देवकते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेले. परंतु `माझ्या नसानसांत इंदिरा कॉंग्रेसची तत्त्वे भिनली आहेत,' असे मानणारे देवकते तेथे जास्त काळ रमले नाहीत. काही महिन्यांतच ते स्वगृही परतले. `कॉंग्रेस माझी आई आहे. तिला सोडून जाणे चुकीचे होते. मात्र मी पुन्हा माझ्या आईकडे परत आलोय. तिच्याशिवाय मी राहू शकत नाही. त्यामुळे जीवनभर मी कॉंग्रेसचे काम करणार आहे,' असा भाव त्यावेळी त्यांच्या मनात होता. `कॉंग्रेस पक्षाने आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मला भरपूर दिले आहे. आता माझी कसलीच इच्छा उरली नाही,' अशी कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात असायची. गांधीवाद हा त्यांच्या राजकारणाचा आदर्श. त्यामुळे पांढरीशुभ्र टोपी, नेहरू शर्ट, धोतर हाच त्यांचा पेहराव. 2011 मध्ये अष्ट्याहत्तरीनिमित्त झालेल्या सत्कारात बोलताना `सोलापुरात छानशी महात्मा गांधी कुटी बांधणार आहे. या कुटीतूनच पक्षाचे काम करणार आहे,' असा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. 

मंत्री, आमदार, कॉंग्रेसचे पदाधिकारी असताना त्यांच्या आसपास वावरणारे अनेक लोक पडत्या काळात त्यांच्यापासून लांब गेले. मात्र, याबाबत त्यांनी कधी नाराजी व्यक्त केली नाही. 16 मार्च 1933 रोजी जन्मलेले आनंदराव नारायण देवकते 12 ऑक्‍टोबर 2018 रोजी देवाघरी गेले. त्यांच्या निधनामुळे दक्षिण सोलापूर तालुका राजकीयदृष्ट्या पोरका झाला आहे. सोलापूर कॉंग्रेससह सर्वच पक्षांना एक रितेपणा जाणवत आहे. कार्यकर्त्यांचा आधारवड आणि मार्गदर्शक हरपला आहे. गेल्या चार दशकांची दक्षिण सोलापूरची राजकीय गुरुकिल्ली हरवली आहे!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com