चिडलेले बाळासाहेब म्हणाले, आनंद, तू सांगतो आहेस तर थांबतो! 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे नातेसंबंध कसे होते, यावर प्रकाश टाकणारी घटना घडली होती 23 वर्षांपूर्वी (1995). आभाळाएवढ्या मोठ्या नेत्याचे आपल्या शिष्यावर किती जिवापाड प्रेम होते, याची आठवण बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने...!
 चिडलेले बाळासाहेब म्हणाले, आनंद, तू सांगतो आहेस तर थांबतो! 

1995च्या विधानसभेचे मैदान गाजत होते. भल्याभल्या नेत्यांनी राज्य पिंजून काढले होते. 1995 ते 1999 दरम्यान राज्यात शिवसेना- भाजपचे युती सरकार सत्तेवर होते. कॉंग्रेस, शिवसेना, भाजप आदी पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली होती.

युतीविरोधात वातावरणनिर्मिती करण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, विलासराव देशमुख, छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांचा सिंहाचा वाटा होता, तर युतीचा किल्ला खुद्द बाळासाहेबांबरोबर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, उद्धव-राज लढवत होते. युतीचे राज्य येणार म्हणजे येणारच, असा दावा साहेब करीत होते, तर पुरोगामी महाराष्ट्रात युती कधीच येणार नाही, असा अंदाज मीडिया बांधत होता. 

1995 मध्ये बाळासाहेबांच्या सभांना मोठी मागणी होती. जेथे साहेबांची सभा होईल, तेथे विजय पक्का समजला जात होता. एक एक दिवस साहेबांसाठी महत्त्वाचा होता. महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या साहेबांची सभा होती नाशिकला. त्या सभेनंतर पालघरमध्ये साहेबांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

साहेब येणार म्हटल्यानंतर शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. सर्वत्र वातावरण भगवे होते. गाड्याघोड्यांवर भगवे झेंडे फडकत होते. आवाज कुणाचा? शिवसेनेचा, अशा गगनभेदी घोषणा दिल्या जात होत्या. बाळासाहेबांचे नाशिकहून पालघरला आगमन झाले. साहेबांचे स्वागतही जंगी झाले. 

पालघर शहरापासून आडवळणाला असलेल्या एका कॉंग्रेस पुढाऱ्याच्या बंगल्यात साहेबांचा मुक्काम होता. त्या वेळी शहरात शिवसेनेचा एकही नेता असा नव्हता, की ज्याचा बंगला होता. सर्व साधारण परिस्थिती असलेले. ज्या बंगल्यात साहेब उतरले होते, तो बंगला नंडोरे गावात होता. तेथे आजूबाजूला वस्तीही नव्हती. बंगला बरेच दिवस बंद होता. काहीशी गैरसोयच झाली. 

खरेतर साहेबांच्या हे सर्व लक्षात येऊनही ते शांतच होते. साहेब दुपारी आले होते. त्यांना असे वाटले, की संध्याकाळी सभा असेल. नेते, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू होत्या. साहेबांचे दर्शन झाले, सहवास मिळाल्याने समाधानाचे, आनंदाचे वातावरण होते; पण हे वातावरण काही क्षणांत बदले, वातावरण तणावाचे बनले. 
साहेबांच्या सभेचे ज्यांनी नियोजन केले होते, ते होते खुद्द शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे. 

बाळासाहेबांनी आनंद दिघेंना विचारले, ""आनंद सभा किती वाजता आहे?'' 
दिघे म्हणाले, ""साहेब, उद्या संध्याकाळी?'' 
साहेब, ""काय! उद्या संध्याकाळी? मग मला आज कशाला आणलेस? 24 तास आधी?'' 
आनंद दिघेंकडे उत्तर नव्हते. 


साहेब प्रचंड चिडले होते. चोवीस तास या बंगल्यात बसून मी काय करणार आहे? आणखी एक- दोन सभा झाल्या तर फायदा झाला नसता का? इतकी वर्षे नियोजन करतोस कळत नाही का? कुठल्या बंगल्यात आणून ठेवले आहेस मला? मला असले नियोजन मान्य नाही. साहेबांनी आनंद दिघेंची चंपी करण्यास सुरवात केली होती. साहेब थांबायला तयार नव्हते. 

साहेब म्हणाले, ""मी क्षणभरही या बंगल्यात थांबणार नाही. मी चाललो!'' 

सोबत असलेल्या थापाला आवरायला सांगितले, त्यानेही आवराआवर करायला सुरवात केली. आनंद दिघेही काहीसे चिंतेत होते. साहेब गेले तर कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फिरेल. साहेबांना कोण थांबविणार? असा एकच प्रश्‍न दिघेंसमोर होता. 

साहेबांच्या दौऱ्यात ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ जोशीही होते. दिघेंना वाटले, की सुधीरभाऊच साहेबांना थांबवू शकतील. 

दिघे म्हणाले, ""भाऊ, काहीही करा; पण साहेबांना थांबवा!'' 

जोशी म्हणाले, ""नाही रे बाबा, मी साहेबांना नाही सांगू शकत. ते चिडले आहेत. माझंही ते ऐकणार नाहीत. जर ते बंगल्याबाहेर पडले, तर ते कोणाचंही ऐकणार नाहीत!'' 

इकडे तर साहेबांची पालघर सोडण्याची तयारी झाली होती. ते बंगल्याबाहेर पडणार होते. काही मोजके नेते आणि कार्यकर्ते बंगल्याशेजारी होते. प्रत्येकाचा चेहरा चिंतेने ग्रासला होता. एकच प्रश्‍न होता, साहेबांना थांबविणार कोण? 

साहेब प्रचंड रागावलेले असतानाही शेवटच्या क्षणी आनंद दिघे साहेबांसमोर जाऊन उभे राहिले. 

हात जोडून आनंद दिघे म्हणाले, ""साहेब मला माफ करा! चुकलो, हवे तर मला शिवसेनेतून काढून टाका! आपण जी शिक्षा द्याल ती स्वीकारायला तयार आहे; पण ही सभा झाली पाहिजे. एका आदिवासी महिलेचा प्रश्‍न आहे. आपली सभा झाली तर त्या शंभर टक्के निवडून येतील.'' 

साहेब आपल्या लाडक्‍या आनंदवर एक नजर टाकतात. दिघे मान खालून उभे असतात. 

बाळासाहेब म्हणतात, ""आनंद तू सांगतोच आहेस, तर मी थांबतो!'' 

साहेब आनंद दिघेंचा शब्द मोडू शकले नाहीत. एक- दोन तास नव्हे, तर 24 तास थांबले. पालघरच्या देवीशहा रोडवरील आंबेवाडी मैदानावर जंगी सभा होते. जनसागर लोटतो. पुढे मनीषा निमकर मोठ्या मताधिक्‍याने निवडून येतात.

युतीच्या काळातच त्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या राज्यमंत्री होतात. याचे श्रेय अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे होते. फाटक्‍या माणसाला मोठे करण्याची ताकद बाळासाहेबांमध्ये होती. मनीषाताईंसारखे अनेक आमदार, खासदार, नेते केवळ साहेबांनीच नव्हे, तर आनंद दिघेंनी घडविले. या दोघांचे नाते कसे होते, हे अशा घटनांवरून लक्षात येते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com