Amruta Phadanavis Paithani Weaving in Pune | Sarkarnama

पैठणीचा धागा विणता विणता मी ‘सिरी’च झाले...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 एप्रिल 2017

लक्ष्मी रस्त्यावरील सौदामिनी हॅंडलूमतर्फे आयोजित विणकाम महोत्सवाचे उद्‌घाटन अमृता यांच्या हस्ते झाले. पैठणी विणायची म्हणून अमृता यांनी हातमागाचा झटका (गट्टू) हातात घेतला. सोबतीला महापौर मुक्ता टिळक होत्या. रेशमाच्या एका धाग्यातून जरीच्या वीस बुट्टया (नक्षीकाम) दोघींनी उत्साहात विणल्या.

पुणे - ‘‘माझ्या लग्नात आईने मला येवल्याची पैठणी दिली. त्या पैठणीला स्पर्श करते तेव्हा मला आईचे प्रेम जाणवते. पैठणी विणायची म्हणून हातमागावर मी प्रथमच दोन टाके विणले. एक-एक धागा विणताना माझे त्या पैठणीशी भावनिक नाते जुळले. ऋग्वेदात वर्णन असलेली विणकाम करणारी स्त्री ‘सिरी’च झाल्यासारखे जणू मला वाटले.’’ पैठणीचे धागे विणल्याच्या आत्मिक आनंदात मुख्यमंत्र्यांच्या ‘गृहमंत्री’ अमृता फडणवीस यांनी ही उत्स्फूर्त दाद दिली.

लक्ष्मी रस्त्यावरील सौदामिनी हॅंडलूमतर्फे आयोजित विणकाम महोत्सवाचे उद्‌घाटन अमृता यांच्या हस्ते झाले. पैठणी विणायची म्हणून अमृता यांनी हातमागाचा झटका (गट्टू) हातात घेतला. सोबतीला महापौर मुक्ता टिळक होत्या. रेशमाच्या एका धाग्यातून जरीच्या वीस बुट्टया (नक्षीकाम) दोघींनी उत्साहात विणल्या. विणकरांकडून जरीच्या काकड्या (जर लावलेले रीळ) विषयी अमृता यांनी जाणून घेतले. उपस्थितांच्या आग्रहाखातर अमृता यांनी चार-पाच वेळा हातमागावरून धागे विणले. धागे विणण्याच्या आनंदात अमृता उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधत होत्या.

अमृता म्हणाल्या, ‘‘विणकामशास्त्राला वैदिक काळापासून महत्त्व आहे. धागा विणत होते, तेव्हा मला आत्मिक आनंद होत होता. कारण, माझी आणि महापौरांची तुलना मी वैदिक स्त्रियांबरोबर करत होते. माझ्या आईने मला दिलेली येवल्याची गुलाबी रंगाची मोर-कैरी पॅटर्नची पैठणी मी जपून ठेवली आहे. माझ्या मुलीलाही मी ती पैठणी देणार आहे. आता ई-कॉमर्सद्वारेही साड्या विकल्या जातात; पण स्त्रियांमध्ये पैठणीची क्रेझ नव्याने आली आहे. स्त्रियांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. जागतिक बाजारपेठेतही पैठणीला मागणी आहे. घरोघरी पैठणी गेली तर ती पुढच्या पिढीपर्यंत पोचेल. विणकरांना चांगले जीवन जगता येईल.’’

उद्योजिका अनघा घैसास म्हणाल्या, ‘‘विणकामशास्त्र ही कला पुनरुज्जीवित व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. विणलेल्या वस्त्राचे भावनिक नाते स्त्रियांशी जुळलेले आहे. सुशिक्षित महिलांनी हातमागावरचे विणकाम शिकून घ्यायला हवे. कारण, महिनाभर विणकाम महोत्सव सुरू राहणार आहे. भावी काळात सिल्क टुरिझमला प्रोत्साहन मिळावे, म्हणून लवकरच विणकाम प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहोत.’’

संबंधित लेख