Amravati news - ex-sarpanch dipti vankhede | Sarkarnama

माजी सरपंच दीप्ती वानखडेंचा कृषी संशोधनात ठसा

सुरेंद्र चापोरकर
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

कृषिक्षेत्रात विकासाच्या भरपूर सधी आहेत. देश-विदेशातील तंत्रज्ञान निश्चितच उपयुक्त असून, त्या दृष्टीने मी कार्य करणार आहे. आपल्याकडील शेती चांगली व्हावी, शेतकऱयांचे जीवनमान उंचावे यासाठी निश्चितपणे कार्य करणार असल्याचे दीप्ती वानखडे यांनी सांगितले.

अमरावती : देशाचा पाया असलेल्या कृषी क्षेत्रात भरीव योगदान देण्याच्या दृष्टीने सरपंचपदालाच खिळून न बसता उच्चशिक्षणाची कास धरणाऱया अमरावतीच्या दीप्ती वानखडे यांनी बॅंकॉकच्या कसेट सार्ट युनिव्हर्सिटीमधून पीएचडी पूर्ण केली. अमरावती जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या सरपंचाने विदेशातील विद्यापीठातून उच्चशिक्षण घेत ते पूर्ण करण्याची ही पहिलीच घटना असावी. विशेष म्हणजे पीएचडीपर्यंतच मर्यादित न राहता आता दीप्ती वानखडे या इस्त्रायल सरकारच्या विशेष उपक्रमासाठी येत्या 27 ऑगस्टला इस्त्रायलला जात आहेत. त्यासाठी त्यांना फेलोशिप मिळाली आहे.

अमरावतीत बीएससी केल्यावर वानखडे यांनी परभणी कृषी विद्यापीठातून एमएससी पूर्ण केले. सन 2010 मध्ये अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. धामणगावरेल्वे तालुक्यातील विरुळरोंघे ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात त्या होत्या. विक्रमी मतांनी विजयी झाल्यावर सर्व सदस्यांनी त्यांच्यावर सरपंचपदाची धुरा टाकली. सरपंचपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ त्यांनी सक्षमपणे सांभाळला. गावाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. उच्च शिक्षणाची आस त्यांनी देश-विदेशातील तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा आणि कृषी क्षेत्रात भरीव योगदान देण्याचा संकल्प केला. त्यातूनच त्या बॅंकाकला रवाना झाल्या. त्या ठिकाणी त्यांनी उष्णकटिबंधीय शेती या विषयावर पीएचडी केली.

दरम्यानच्या काळात त्यांनी जपानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भाग घेतला. बेस्ट ओरल प्रझेंटेशन अवॉर्डनेसुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले. बेल्जियममध्ये झालेल्या पर्यावरणविषयक परिषदेमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत त्यांनी देश-विदेशातील विविध विद्यापीठांत आपला वावर वाढविल्याने ग्लोबल स्टुडंट म्हणूनही त्यांची ओळख झाली. त्यामुळेच इस्रायल सरकाच्या विशेष उपक्रमासाठी भारतातून केवळ चार जणांची निवड झाली. त्यात दीप्ती वानखडे यांचा समावेश आहे.   

दीप्तीचे वडील जयंत वानखडे हे शेतकरी, आई प्रतिभा या अमरावती महापालिकेच्या माजी नगरसेविका, तर भाऊ वैभव वानखडे वकील आहेत. देश-विदेशात नाव कमावले असले, तरी दीप्ती यांनी काळ्या मातीशी नाते तोडलेले नाही. अमरावतीत येताच त्यांना सातत्याने शेतावर जाण्याची, आपल्या गावातील महिलांशी संवाद साधण्याची उत्सुकता राहते. त्यामळे त्या गावातच मुक्काम करतात. 

 

संबंधित लेख