बेनोड्याचे आठ क्रांतिवीर झाले देशासाठी शहीद 

बेनोड्याचे आठ क्रांतिवीर झाले देशासाठी शहीद 

बेनोडा शहीद, (जि. अमरावती) : 9 ऑगस्ट 1942 रोजी परिसरातील गावागावांत क्रांतीचा ज्वालामुखी पेटला होता. या आठवणी आजही ताज्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्‍यातील बेनोडा या गावातील आठ वीरांनी देशासाठी आहुती दिली. हुतात्म्यांच्या या वीरमरणांमुळे या गावाची ओळख स्वातंत्र्यांच्या इतिहासात "बेनोडा शहीद' असे कोरले गेले. तेच नाव आता रुळले आहे. 

इंग्रज सरकारच्या विरोधात इत्तमगावचे वामनराव पाटलांच्या अध्यक्षतेत 15 ऑगस्ट 1942 ला लोणी येथे सभा झाली. या सभेत बेनोडा पोलिस ठाण्याचे दप्तर जाळून चौकीवर तिरंगा फडकवायचे ठरले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी श्रावण फरकाडे, नत्थूजी भुतडा, रामभाऊ फरकाडे, बळीराम फरकाडे, रामभाऊ गोहाड, विनायक बंड यांना पोलिसांनी अटक केली. दुपारी दोनच्या सुमारास हा मोर्चा बेनोडा चावडीवर आला. हा आवाज पोलिस ठाण्याला सहज पोचला. त्या वेळी बेनोड्याचे स्टेशन ऑफिसर निंबाळकर, शिपाई रामदुलारे, मोहंमद युनूस, रामपदारत, अब्दुल जब्बार, रामसुमेर या सर्वच जणांनी बंदुका घेऊन मोर्चाला धवलगिरी नदीवरील अडचणींच्या पुलावर अडविले.

या वेळी इंग्रज शिपायाने शिव्या दिल्या, त्या इत्तमगावच्या महादेव वाघमारेंना सहन झाल्या नाहीत. तोच रामपदारत शिपायाने त्यांच्यावर बंदूक रोखली. वाघमारेंनीही आपल्या हातातील काठीचा जबर प्रहार रामपदारतवर केला. इतक्‍यात कुणीतरी पाठीमागून दगड भिरगावला. तो या शिपायाच्या डोळ्याला लागला. रामसुमेर व अ. जब्बार या शिपायांनी गोळी हवेत झाडली. रामसुमेरच्या बंदुकीतून सुटलेली गोळी इत्तमगावच्या महादेव फांदडे यांच्या छातीत घुसली. 

दरम्यान साथीदाराच्या बलिदानाने सर्वांना त्वेष चढला. यानंतर एकामागून एक स्वातंत्र्यवीर टिपले गेले. महादेवराव बारमासे, महादेवराव वाघमारे, महादेवराव फांदाडे, विनायकराव यावले, वामनराव पाटील, तुकाराम माणिकपुरे, पांडुरंगजी मालपे व रामराव गोहाड शहीद झाले.
 
शिवाय संतोष बोरकर, गोविंदा तुमराम, माणिक बोरकर, श्रीराम वानखडे, बाबूराव माणिकपुरे, मारोती लिखितकर, शंकरराव पापडकर, उदेभान अंभाडकर, माणिकराव आगरकर, नत्थू मालपे, बिसन नेरकर, बाजीराव बरडे, गोपाळराव देवधरे, गंगाराम जोशी हे यात जखमी झाले. 

16 ऑगस्ट रोजीच्या गोळीबारात एकूण 59 गोळ्या झाडल्या गेल्या, त्यात 8 स्वातंत्र्यवीर शहीद, तर 18 जखमी झाले. पैकी अनेकांनी रुग्णालयात जीवनयात्रा संपविली. या रणसंग्रामाने बेनोडा परिसराचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com