अंमळनेरच्या राड्याने भाजपची काय शोभा राहिली ! 

लाखो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्यागावर उभा राहिलेल्या भाजप सारख्या पक्षात "हवसे, नवसे, गवश्‍यां' नी कधी घुसखोरी केली हे कळलेत नाही. निवडणूक जिंकण्याचा निकष पाहिला गेल्याने बाजारबुणग्यांचाच अधिक भरणा झाला आणि निष्ठावंतांची उपेक्षा. आमदार, खासदारकीसाठी नेते कोणत्या थराला जातात हे अंमळनेरमधील भाजपच्या सभेने दाखवून दिले आहे. "पार्टी विथ डिफरन्स'चा गर्व गळून पडला आहे.
 अंमळनेरच्या राड्याने भाजपची काय शोभा राहिली ! 

परमपूज्य साने गुरुजी आठवले की अंमळनेर आठवते. श्‍यामची आई आठवते. त्याचबरोबर संस्कार, शिस्तही आठवते. गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंमळनेरच्या पवित्र भूमीत काल भाजप नेत्यांनी जो काही धिंगाणा घातला तो कपाळावर हात मारून घेणारा होता.

वास्तविक देशभरात राष्ट्रीय, प्रादेशिक मिळून जे काही सात-आठशे पक्ष आहेत. त्यापैकी भाजपकडे शिस्तीचा पक्ष म्हणून पाहिले जाते. तसा दावा संघ आणि भाजपची मंडळी नेहमीच करीत असतात. विशेषत: कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या राडा संस्कृतीवर नाक मुरडणाऱ्या आणि उपदेशाचे डोस पाजणाऱ्या, संस्काराच्या गप्पा मारणाऱ्या भाजप नेत्यांना आता शरमेने मान खाली घालावी लागली असेल. 

पक्ष जेव्हा लहान असतो तेव्हा शिस्त वैगेरेच्या गप्पा मारणे ठीक असते पण, तोच पक्ष वटवृक्षासारखा पसरला, बहरला की कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मर्जी राखणे, रुसवेफुगवे दूर करणे कसे सोपे नसते हे अंमळनेरमधील राड्यावरून भाजप नेतृत्वाच्या लक्षात आले असेल. 

अंमळनेर येथे शिवसेना व भाजप युतीचा लोकसभेच्या प्रचारासाठी संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष उदय वाघ व माजी आमदार बी. एस. पाटील यांच्यात व्यासपीठावरच शाब्दिक चकमक होऊन लाथाबुक्‍यांची फ्री स्टाइल हाणामारी झाली. या मारामारीच्या मध्ये संकटमोचन बनून मंत्री गिरीश महाजन यांना कार्यकर्त्यांना रोखावे लागले. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे दृष्य उघड्या डोळ्यांनी शांतपणे पाहत होते. 

उदय वाघ यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानी अर्जही भरला होता. त्यावेळी नाराज झालेले विद्यमान खासदार ए .टी.पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात बी. एस. पाटील उपस्थित होते. त्यांनी स्मिता वाघ यांच्या उमेवारीला विरोध करीत वाघ यांच्यावर टीका केली. त्याचा राग या सभेत निघाला. 

खरेतर तिकीट नाकारल्यानंतरही आम्ही भाजपचे निष्ठावंत आहोत. दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करू असे सांगणाऱ्या किंवा तसा टेंभा मिरविणाऱ्या मंडळींच्या मनात वेगळेच असते हे या निमित्ताने दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे ते जळगावला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते गिरीश महाजन यांच्याच जळगावात पक्षाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत असे म्हणावे लागेल. 

राडा म्हटले की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभी राहते शिवसेना. गेल्या पाच दशकात शिवसेनेने शेकडो नव्हे तर हजारो आंदोलने केली. शिवसेनेच्या आंदोलनाचा नेहमीच धसका घेतला जातो. त्याला काही लोक राडा म्हणतात. मारामारी, दगडफेक, जाळपोळ, तोडफोड, रास्ता रोको हे शिवसेनेच्या आंदोलनाचे वैशिष्ठ्य. 

आज शिवसेनेचा मोठा भाऊही त्याच मार्गाने जाऊ लागला आहे. पूर्वी भाजप शिवसेनेचा लहान भाऊ होता. मर्यादित आणि निष्ठावंत कार्यकर्ते 
होते. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्ष कसा वाढेल. तो अधिक कसा बळकट होईल हे स्वप्न तो पाहात होतो. पक्षाने दिलेली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडत असे. तोंडात साखर, डोक्‍यावर बर्फ आणि पायाला भिंगरी बांधून संघ आणि जुन्या भाजपच्या मंडळींनी पक्षासाठी खूप खस्ता खाल्या. 

डोंगराळ आदिवासी भाग असो की साखरसम्राटांचा बालेकिल्ला. पहिले पणती हातात घेऊन तर पुढे कमळ घेऊन पक्षाचा प्रचार आणि प्रसार करीत राहिले. लाखो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्यागावर उभा राहिलेल्या भाजप सारख्या पक्षात "हवसे, नवसे, गवश्‍यां' नी कधी घुसखोरी केली हे कळलेच नाही. निवडणुकीत जिंकण्याचा निकष पाहिला गेल्याने बाजारबुणग्यांचाच अधिक भरणा झाला आणि निष्ठावंताची उपेक्षा. भाजपपेक्षा मातृसंस्थेतील एखाद्या अन्य सामाजिक, शैक्षणिक संस्थेसाठी स्वत:ला वाहून घेतलेले काही कार्यकर्तेही एकेकाळी याच पक्षात होते. हे विसरता येणार नाही. 

आज भाजपत आला की त्याला थेट उमेदवारी दिली जाते. तो कॉंग्रेसमध्ये खासदार असला की भाजप आल्यानंतरही त्याला खासदारच व्हावे वाटते. ज्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा आरोप भाजप नेहमीच करीत आला. त्याच पक्षातही घराणेशाही कधी घुसली हे पक्षाच्या नेत्यांना कळले नाही. तरीही आमच्या पक्षात घराणेशाही नाही असा दावा केला जातो. तेव्हा हे सर्व हास्यास्पद वाटते. 

आज महाराष्ट्राच्या राजकारणाकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर असे लक्षात येते की, ओबीसी समाज भाजपकडे मोठ्या संख्येने गेला होता. त्यापाठोपाठ आदिवासी आणि इतर समाजही होता. काही प्रमाणात मराठा समाजही होता. आता मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादीची जी प्रस्थापित घराणी होती तीच मंडळी भाजपमध्ये आली. पक्षाचे चिन्ह आणि झेंडा बदलला. पण, संस्कार बदलले नाहीत. गमतीने असे म्हटले जाते की कॉंग्रेसवाले कुठल्याही पक्षात जावोत ते कॉंग्रेसीच असतात. ते मनाने कधीच बदलत नाही. 

अमळनेरमध्ये भाजपच्या सभेत जो राडा झाला. तो राडा पाहून खरंच ही भाजपची सभा होती का असा प्रश्‍न पडला. सध्या पक्षात प्रत्येकालाच आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व्हायचे आहे. स्पर्धा इतकी तीव्र आहे की एकमेकांच्या जीवावरही उठले जात आहे. मंत्री व्यासपीठावर असताना राडा होतो. लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण होते. गोंधळ होतो. मंत्र्यांना मारामारीत उतरावे लागते हे सर्व चित्र भयावह आहे. 

शिवसेनेच्या राडा आणि कॉंग्रेसच्या संस्कृतीच्या नावाने कडाकडा बोटे मोडणाऱ्या, नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपच्या मंडळींना आता काय वाटले असेल. आपणही काही वेगळे नाहीत. शेवटी सत्तेसाठी माणसं कुठल्या थराला जातात हेच यावरून दिसून आले. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी निघालेली पक्षातील मंडळी खासदारकीच्या तिकीटावरून कसे एकमेकांवर तुटून पडतात हे देशाने पाहिले. असल्या आपमतलबी कार्यकर्त्यांच्या जिवावर कोणताही पक्ष मोठा होऊ शकत नाही हे ही यानिमित्ताने लक्षात घेतले पाहिजे. 

ऐन निवडणुकीच्या काळात आणि मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपचा राडा पाहून विरोधकही सुखावले असतील. जर हाच राडा कॉंग्रेसच्या व्यासपीठावर झाला असता तर भाजपवाल्यानी कॉंग्रेसला बदनाम केले असते. निवडणुकीचा मुद्दा बनला असता. आता भाजपला राडा संस्कृतीवर बोलण्याचा अधिकार राहिला नाही. मुळात या पक्षातही मनगटशाही आली आहे. जे यूपी, बिहारमध्ये घडते ते महाराष्ट्रातील भाजपमध्येही सुरू आहे. "यूपी' पेक्षा आपणही वेगळे नाहीत हेच अमळनेरच्या भाजप सभेने दाखवून दिले आहे. भाजपची शोभा राहिली नाही हेच दिसून आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com