'हाता'ला साथ ते 'सायकल'वर हात : शहेनशहा अमिताभचा असाही राजकीय प्रवास 

'हाता'ला साथ ते 'सायकल'वर हात : शहेनशहा अमिताभचा असाही राजकीय प्रवास 

भारतीय चित्रपटसृष्टीच्या "शहेनशहा'ने पंच्चाहत्तरीत पदार्पण केले. सुमारे पन्नास वर्षाच्या चित्रपट सृष्टीतील आपल्या करिअरमध्ये अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूड ते हॉलीवूड असा प्रवास करताना यशाची आणि लोकप्रियतेची अनेक उत्तुंग शिखरे सर केली आहेत. वाढत्या वयाबरोबर आणि बदलत्या परिस्थितीनुसार आपल्यातील अभिनेत्याला नव्याने शोधण्याचे आणि नव्या पिढीशी नाळ जोडण्याचे असामान्य कौशल्य असलेल्या या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत देदीप्यमान यश संपादन केलेले आहे. आपल्या विजयाची पताका सर्वत्र फडकविणाऱ्या अमिताभ बच्चन यांना राजकारणाचे रणांगण मात्र सोडावे लागले. 

"मित्राला मदत करण्याच्या भावनेने आपण राजकारणात आलो. राजकारणात येण्याचा निर्णय भावनेच्या भरात घेतला पण राजकारणात भावनांना स्थान नसते, हे मला उशिरा कळले. राजकारण सोडल्याचे दुःख नाही पण अलाहाबादच्या मतदारांना दिलेले आश्‍वासने आपण पूर्ण करू शकलो नाही. याची खंत मनात कायम राहील,'' हे शब्द आहेत साक्षात अमिताभ बच्चन यांचे. 

कै. राजीव गांधी आणि अमिताभ हे दोघेही बालपणीचे मित्र. नेहरू आणि बच्चन कुटुंबीयांचे अलाहाबाद हे मूळ गाव. भारताच्या पंतप्रधान कै. इंदिरा गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री तेजी बच्चन या दोघी जवळच्या मैत्रिणी. लहानपणी राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन एकत्र खेळलेले. सोनियाजींशी राजीव गांधींचा विवाह व्हावा यासाठी इंदिरांजींचे मन वळविले ते श्रीमती तेजी बच्चन यांनीच. राजीव गांधी यांचे सोनिया गांधी यांच्याशी लग्न ठरल्यानंतर सोनियाजी आणि त्यांचे कुटुंबीय भारतात येऊन राहिले ते बच्चन कुटुंबीयांसमवेत. पुढे अमिताभ चित्रपटात पाय रोवण्यासाठी धडपडत असताना पायलट असलेले राजीव गांधी अनेकदा त्यांना सेटवर भेटायला जात असत. 

1982 मध्ये अमिताभ बच्चन यांना कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मारामारीच्या सीनमध्ये गंभीर दुखापत झाली. अमिताभ बच्चन मुंबईतील रुग्णालयात मृत्यूशी झुंज घेत असताना पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींनी रुग्णालयात धाव घेतली होती. इंदिरा गांधींनी मंतरलेला ताईत अत्यवस्थ अमिताभच्या उशाला ठेवायला लावला होता. अमिताभ बच्चन यांच्या दीर्घायुष्यासाठी इंदिरा गांधींनी दहा दिवसांची विशेष पूजा देखील स्वतःच्या घरी त्यावेळी करवून घेतली होती. राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्यात अतिशय घनिष्ठ मैत्री होती. संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर राजीव गांधींना इंदिराजींनी राजकारणात आणले. इंदिरांजीनी राजीव गांधींशी बोलताना अमिताभ बच्चन यांना राजकारणात आणू नये आणि मंत्रिमंडळात घेऊ नये, असा सल्ला दिला होता, असे माखनलाल पोतेदार यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे. 

इंदिराजींचा सल्ला राजीव गांधी यांनी ऐकला असता तर कदाचित आज चित्र वेगळे असते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी अमिताभ बच्चन यांना आग्रह करून कॉंग्रेस पक्षात घेतले. 1984 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अलाहाबाद मतदारसंघातून अमिताभ बच्चन यांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. एकेकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले हेमवंतीनंदन बहुगुणा यांचा मोठा पराभव करताना अमिताभ बच्चन यांनी झालेल्या मतदानाच्या 68 टक्के मते मिळवली होती. खासदार झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांची राजीवजींशी जवळीक असल्याने कॉंग्रेस पक्षात आणि ब्युरोक्रसीत मोठा दबदबा होता. अरुण नेहरू, सतीश शर्मा, अरुण सिंग, कमलनाथ आणि अमिताभ बच्चन हे राजीव गांधी यांच्या निकटवर्तुळात होते. मात्र अमिताभ बच्चन यांचा प्रभाव वाढत चालल्याने पक्षामध्ये अनेक शत्रूही पाहता पाहता तयार झाले होते. व्ही. पी. सिंग हे त्यात आघाडीवर होते. 

बोफोर्स घोटाळ्याने राजकीय करिअरला धक्का 

1986-87 मध्ये बोफोर्स तोफ घोटाळा उजेडात आला. या घोटाळ्यात मध्यस्थांना कोट्यवधी रुपयांची दलाली देण्यात आल्याचे जगासमोर आले. राजीव गांधी यांना पदच्युत करण्यासाठी सर्व विरोधक एकवटले होते. राजीव गांधीच्या विरोधात बंड करून बाहेर पडलेले कै. व्ही. पी. सिंग यांनी आणि इतर विरोधकांनी बोफोर्सच्या दलालीवरून अमिताभ बच्चन यांना टार्गेट केले. विरोधकांनी आणि वृत्तपत्रांनी अमिताभ बच्चन आणि त्यांचे बंधू अजिताभ बच्चन यांच्या विरुद्ध टीकेचा धुरळा उडवून दिला. (पुढे न्यायालयात आणि तपासात बोफोर्सच्या दलालाशी अमिताभ बच्चन आणि त्यांचा भावाचा काडीमात्रही संबंध नव्हता हे निष्पन्न झाले. पण ते होण्यास बरीच वर्षे लागली.) अमिताभ बच्चन यांचे नाव मोठे होते आणि राजीवजींशी त्यांची मैत्रीही होती. त्यामुळे त्यांच्याभोवती संशयाचे वादळ उभे राहिले. राजीव गांधी यांनी अमिताभ बच्चन यांची म्हणावी तशी बाजू घेतली नाही. कैवार घेतला नाही. अमिताभ यांचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही, असे सांगितले गेले नाही. 

कॉंग्रेस पक्षात अमिताभ बच्चन एकाकी पडत गेले. बोफोर्स प्रकरणात अमिताभ बच्चन यांच्या नावाचा वापर मूळ दलालांची नावे समोर येऊ नयेत म्हणून "स्मोक स्क्रीन' प्रमाणे कॉंग्रेस पक्षातील काहीजणांनी केला. उत्तर प्रदेशातही अमिताभ यांच्या विरोधात रान पेटवले गेले. राजीव गांधी यांच्याशी त्यांचे संबंध बिघडत गेले. अखेर 1987 मध्ये खासदारकीची जेमतेम तीन वर्षे पूर्ण झालेली असताना अमिताभ बच्चन यांनी खासदारकीचा आणि कॉंग्रेसचा राजीनामा दिला. नंतरही राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्यात मैत्री कायम राहिली मात्र नात्यातील आपुलकी आणि ओलावा संपला होता. 

अमरसिंग आले मदतीला धावून 

मे 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी एकाकी पडलेल्या सोनिया गांधी यांच्या मदतीला जाणार का? आणि राजकारणात पुन्हा सक्रिय होणार का? यावर बरीच चर्चा झाली पण अमिताभ बच्चन यांनी राजकारणापासून दोन हात दूर राहणे पसंत केले. अमिताभ बच्चनही या काळात संकटातून आणि संघर्षातून पुढे चाललेले होते. त्यांनी नायक म्हणून काम केलेले चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर धडाधड कोसळत होते. अमिताभ बच्चन यांची "एबीसीएल' या चित्रपट आणि करमणूक क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी पांढरा हत्ती ठरली. या प्रयोगाने अमिताभ बच्चन यांचे अक्षरशः दिवाळे निघाले. अशा वेळी गांधी कुटुंबीयांकडून मदतीचा हात पुढे केला जाईल अशी आशा बच्चन कुटुंबीयांना होती. पण तशी कुठलीही मदत गांधी परिवाराकडून झाली नाही. मदतीला धावून आले ते समाजवादी पार्टीचे अमरसिंग. तेव्हापासून अमिताभ बच्चन यांची अमरसिंगांनी सावली सारखी पाठराखण केली. 

मुलायमसिंग यांच्या "सायकल'वर हात 

अमरसिंग यांच्या मुळे समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंग यादव आणि अमिताभ बच्चन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. अमरसिंग यांच्या आग्रहापोटी समाजवादी पार्टीने जया बच्चन यांना राज्यसभेवर खासदार केले. त्यामुळे गांधी आणि बच्चन कुटुंबातील दुरावा अधिक वाढला. याबाबत जया बच्चन यांनी जाहीरपणे "ज्यांनी आम्हाला राजकारणात आणले ते आम्ही संकटात असताना एकटे सोडून गेले,' अशी टीका केली होती. "आम्ही एकदा ज्यांना आपले मानले त्याना अंतर देत नाही, पण त्यांनीच निष्ठा बदलली तर काय करायचे?', अशा शब्दात राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले होते. दोन्ही बाजूंनी संबंध आपल्यामुळे तुटले नाहीत हे दर्शविण्याचा प्रयत्न झाला. खुद्द अमिताभ बच्चन यांनी या विषयावर बोलताना असे म्हटले होते, ""ते (गांधी) राजे आहेत तर आम्ही रंक आहोत. आमच्यासारख्या सामान्य रंकाशी संबंध ठेवायचे की नाही हे राजाच्या मनावर असते.'' गांधी घराण्यापासून दुरावत गेलेले अमिताभ बच्चन गेल्या पंधरा-वीस वर्षात विरोधी पक्षांकडे ओढले गेले. 

राजकारणाने पिच्छा पुरवलाच! 

अमिताभ बच्चन आणि सोनिया गांधी यांच्यातील कटुता वाढतच गेली. 2005 मध्ये कॉंग्रेस केंद्रामध्ये सत्तेत असताना अमिताभ बच्चन आजारपणामुळे लीलावती रुग्णालयात दाखल होते. इन्कम टॅक्‍सच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन अमिताभ बच्चन यांना साडेचार कोटी रुपयांची कर भरण्याची नोटीस बजावली होती. "कौन बनेगा करोडपती'च्या यशानंतर अमिताभ बच्चन यांची आर्थिक घडी चांगली बसलेली होती. त्यांनी रुग्णालयात असतानाच टॅक्‍सची रक्कम भरून टाकली असे म्हणतात. 2006 मध्ये सुद्धा इन्कमटॅक्‍सचा ससेमिरा अमिताभ बच्चन यांच्यामागे कॉंग्रेसने लावल्यावर मुलामयसिंग आणि समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते अमिताभ बच्चन यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले होते. महाराष्ट्रातही अमिताभ यांनी लोणावळ्यात आठ एकर जमीन खरेदी केल्यावर कॉंग्रेसच्या सत्ताधीशांनी राज्य सरकारमार्फत त्यांना नोटीस बजावली. ते शेतकरी नसल्याने जमीन नावावर करण्यात अडथळे आणले. पुन्हा त्यांच्या मदतीला मुलायमसिंह आले. उत्तर प्रदेशातील बाराबंकी भागात अमिताभ यांची जमीन असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने लोणावळ्यातील जमिनीच्या मार्गातील अडथळे दूर झाले. 2010 मध्ये बांद्रा-वरळी सी-लिंकच्या उड्डाणपुलाच्या उद्‌घाटनाला अमिताभ बच्चन हजर राहिल्याने तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना बरेच काही ऐकून घ्यावे लागले होते तर चित्रपटसृष्टीत विलासराव देशमुखांचे अमिताभ बच्चन यांच्याशी चांगले संबंध असल्याचे कॉंग्रेसमधील अनेकांना रुचत नव्हते. 

बाळासाहेब ठाकरेंशी घनिष्ठ संबंध 

शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही अमिताभ बच्चन यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अमिताभ बच्चन यांच्या विषयी खूप आदर होता आणि त्यांनी तो वेळोवेळी बोलूनही दाखविलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर पूर्वपरवानगी शिवाय दाखल होणाऱ्या मोजक्‍या लोकांत अमिताभ यांचा समावेश होता. बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना नियमित भेटणाऱ्यात अमिताभ होते. कै. बाबासाहेबांनाही अमिताभ यांचे कौतुक होते. उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. 

मोदी यांच्याशीही दोस्ताना! 

गुजरातच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या जाहिरातीवरूनही कॉंग्रेसने वादंग निर्माण केले होते. अगदी अलीकडच्या काळातही पनामातील बॅंकांमध्ये अनेक भारतीयांचा काळा पैसा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे नाव कॉंग्रेसने वादात ओढलेच होते. नरेंद्र मोदी यांच्याशी अमिताभ बच्चन यांच्याशी वैयक्तिक संबंध चांगले आहेत. यावरूनही विरोधकांनी त्यांचावर टीका केलेली आहे. 
थोडक्‍यात सांगायचे तर ज्या राजकारणाला वैतागून अमिताभ बच्चन यांनी तीस वर्षापूर्वी खासदारकीचा राजीनामा दिला आणि सक्रिय राजकारणातून निवृत्ती पत्करली त्या अमिताभ बच्चन यांचा पिच्छा राजकारण अजूनही पुरवीत आहे. राजकारण ही अशी गुहा आहे की ज्यामध्ये फक्त प्रवेशाचे दार आहे पण बाहेर पडण्यासाठी दार नाही, असे म्हटले जाते. महानायकाला हे पटलेले असावे. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात अनेकदा व्हिलन हे राजकीय नेत्याच्या रूपात दिसायला लागले. अमिताभ बच्चन यांनीही "सरकार'सह अनेक चित्रपटात राजकीय नेत्यांच्या भूमिका वास्तवदर्शी पद्धतीने सादर केल्या आहेत. त्यामुळे राजकारणातून बाहेर पडूनही अमिताभ यांचे राजकारणाशी असलेले नाते कायम राहिलेले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com