amit shaha tour | Sarkarnama

अमित शहांच्या भेटीपूर्वी मंत्र्यांचा मार्केटिंग फंडा 

संजीव भागवत 
मंगळवार, 30 मे 2017

राज्यात लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी अमित शहा यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याचीही शक्‍यता आहे. त्यामुळे आपले काम कसे चांगले आहे, याची वातावरण निर्मिती मंत्र्यांकडून सुरु आहे. 

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यापूर्वी भाजपच्या मंत्र्यांची कामगिरी उठावदार दिसावी म्हणून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन धोरणे आणि योजनांचा पाऊस पाडण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर विविध मंत्र्यांनी पत्रकार परिषदा घेऊन आपल्या विभागाचे मार्केटिंग केले. 

मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगेच पत्रकार परिषद बोलावली. आपण राज्यात नवीन स्वतंत्र असे उर्जा संवर्धन धोरण देशात पहिल्यांदाच कसे आणत आहोत, याची माहिती दिली. या धोरणाच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत एक हजार मेगावॉट वीजेची बचत करण्यासाठी काय कार्यक्रम आखणार आहोत, याची मोठी यादी त्यांनी मांडली. त्यासोबतच सरकारकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेतून आपण शेतकऱ्यांना माफक दरात वीज उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले. 

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनीही शेतीमालाच्या मूल्यवर्धनासह कृषी पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. या योजनेत शेतीमालाचे मूल्यवर्धन, उत्पादित अन्न पदार्थांच्या गुणवत्तेत वाढ, शेतमालाच्या काढणीनंतरचे नुकसान कमी करणे, बाजारपेठेची निर्मिती यासह ऊर्जा बचतीसाठीच्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण, प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची निर्यात आणि ग्रामीण भागातील लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आदी प्रमुख बाबींचा समावेश असल्याचे फुंडकर यांनी सांगितले. 

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेही यात कुठे मागे राहिले नाहीत. त्यांनीही उर्जामंत्र्यांची पत्रकार परिषद संपताच आपली पत्रकार परिषद सुरू केली. त्यात त्यांनी खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीत होणाऱ्या भ्रष्टाचाराला चाप बसविण्यासाठी या शाळांतील शिक्षकांची भरती ही केंद्रीय पद्धतीने केली जाणार असल्याचे जाहीर केले. त्यासोबतच त्यांनीही राज्यात पहिल्यांदाच आपण महाराष्ट्र राज्य मुक्‍त विद्यालय ही नवीन योजना आणत असल्याचे जाहीर करून ती योजना कशी आहे, याची माहिती दिली. 

 

संबंधित लेख