Amit Shaha Raosaheb Danve BJP Meeting | Sarkarnama

अमित शहांबरोबरच्या बैठकीत राणेंचे नांवही निघाले नाही

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी (ता. 13) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीती आणि संघटनात्मक बांधणी या विषयावर बैठकीत चर्चा झाल्याचे रावसाहेब दानेव यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितले. राज्यमंत्री मंडळाचा विस्तार किंवा नारायण राणे यांच्या मंत्रीमंडळ समावेशावर चर्चा झाली का? असे विचारले असता नारायण राणे यांचा बैठकीत विषयच झाला नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी (ता. 13) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीती आणि संघटनात्मक बांधणी या विषयावर बैठकीत चर्चा झाल्याचे रावसाहेब दानेव यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितले. राज्यमंत्री मंडळाचा विस्तार किंवा नारायण राणे यांच्या मंत्रीमंडळ समावेशावर चर्चा झाली का? असे विचारले असता नारायण राणे यांचा बैठकीत विषयच झाला नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. 

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थिती आणि संघटनात्मक बांधणीवर चर्चा करण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत अमित शहा यांची दुपारी भेट घेतली. तासभर या दोघांमध्ये चर्चा झाली. 

राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराची आणि त्यात काँग्रेसमधून स्वतःचा पक्ष काढून एनडीएत सहभागी झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा समावेश होणार का? यावर बऱ्याच महिन्यांपासून राज्यात चर्चा सुरु आहे. मंत्रीमंडळ विस्ताराचे आतापर्यंत अनेक मुर्हूत हुकले. शिवाय राणे यांचा मंत्रीमंडळातील समावेश लांबणीवर पडल्याने त्यांनी देखील मुख्यमंत्री आणि भाजप बद्दलची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. 

या पार्श्‍वभूमीवर मंत्रीमंडळ विस्तारावर राणेंच्या समावेशा संदर्भात शहा यांच्या सोबत बैठकीत चर्चा झाली का? असे विचारले असता दानवे यांनी अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांना पत्रकारांनी ''तुमचा मंत्रीमंडळात समावेश कधी होणार' असा प्रश्‍न उपस्थित केला होता. यावर मला विचारण्यापेक्षा तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा,'' असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली होती. मला जास्त वाट पाहण्याची सवय नाही असे म्हणत राणे यांनी वेळोवेळी भाजप व मुख्यमंत्र्यांना देखील अप्रत्यक्ष इशारा दिला होता. 

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापुर्वी माझा मंत्रीमंडळात समावेश होईल असा दावा देखील राणे यांनी औरंगाबादेत बोलतांना केला होता. परंतु, अमित शहा आणि रावसाहेब दानवे यांच्या बैठकीत राणेंचा विषयच निघाला नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केल्याने नारायण राणे यांना मंत्रीपदासाठी आणखी वाट पहावी लागणार असे दिसते.

संबंधित लेख