amit shaha in mumbai visit | Sarkarnama

बेरजेच्या राजकारणातही शत प्रतिशत भाजप चाच अजेंडा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जून 2017

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशव्यापी दौऱ्याअंतर्गत तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असून आजचा त्यांचा राज्यातला अखेरचा दिवस आहे. राज्यातील बुथ लेवलच्या पदाधिकाऱ्यांपासून प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत ते संवाद साधणार आहेत.

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशव्यापी दौऱ्याअंतर्गत तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असून आजचा त्यांचा राज्यातला अखेरचा दिवस आहे. राज्यातील बुथ लेवलच्या पदाधिकाऱ्यांपासून प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत ते संवाद साधणार आहेत.

राज्यातील प्रत्येक मतदारसंघात ताकत वाढविण्याच्या दृष्टीने स्थानिक पदाधिकारी, आमदार आणि मंत्री यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी घेतला. शतप्रतिशत भाजप हा अजेंडा राज्यात पुढील काळात असेल हे दाखवून देण्याचा प्रयत्न अमित शाह यांनी केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राज्यातील एनडीएच्या घटक पक्षांना भेटून त्यांनी बेरजेचे राजकारणही या दौऱ्यात केल्याचे दिसून आले. 

मुंबईत आल्यानंतर शुक्रवारी पहिल्या दिवशी दादरला शिवाजी पार्क येथे चैत्यभूमीवर जाउन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, स्वातंत्रवीर सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर जावून अमित शाह यांनी अभिवादन केले. या घटनेतून त्यांनी सर्व घटकांना घेऊन आपण पुढे चाललो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुपारनंतर त्यांचा भेटीगाठी आणि बैठकांचा कार्यक्रम सुरू झाला. 

सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम करताना त्यांनी आमदार खासदार आणि भाजप पदाधिकारी, एनडीएचे घटक पक्ष आरपीआय, रासप, शिवसंग्राम, जनसुराज्य आदी पक्षांच्या प्रमुखाशी चर्चा करून सर्वांना घेऊन पुढे जात असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील निवडक संपादकाशी चर्चा करताना राष्ट्रपती पदासाठी कोण आणि कसा उमेदवार हवा हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच चर्चगेट येथील गरवारे क्‍लब येथे भाजपचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्याशी चर्चा करताना भाजपचा पुढील काळातील कार्यक्रम काय असेल आणि नेमका कशावर भर असेल याची कल्पना दिली.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्यातील भाजप मंत्र्याची बैठक घेऊन सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन केले. जनतेसमोर सरकारची प्रतिमा चांगली व्हावी आणि येणाऱ्या निवडणूकामध्ये पक्षाला यश मिळावे यासाठी जोमाने कामाला लागा असा आदेश त्यांनी दिले. 

शहा यांचे सर्वाधिक कार्यक्रम शनिवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी होते. परंतु लोकल प्लॅनिंगच्या नावाखाली काही ठिकाणे आणि कार्यक्रमाचे स्वरूप माध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. सकाळी पावणे नऊच्या पहिल्या कार्यक्रमापासून ते रात्री साडे दहापर्यंत शहा यांनी अनेक उद्योग समूहाचे प्रमुख, विविध क्षेत्रातील निष्णात मंडळींशी चर्चा केल्याचे समजते.

लोअर परळ येथे यशवंत भवन, दादर येथील कोहिनूर हॉल येथे त्यांनी मार्गदर्शनपर कार्यक्रम केले. दौऱ्यादरम्यान दादर येथील भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना भाजपची राज्यात ताकत वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. 

अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीकडे लक्ष 
अमित शहा हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रविवारी सकाळी 11 च्या सुमारास भेटणार आहेत. शिवसेना हा केंद्रात एनडीएचा घटक पक्ष असला तर राज्यात शत प्रतिशत भाजप येईल अशी व्यूहरचना करत शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने गेल्या तीन वर्षामध्ये 25 वर्ष मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. गुजरातचा सिह मोठा की महाराष्ट्रचा वाघ यावरून राजकीय पटलावर चर्चा झाली. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे महत्व कमी करण्याचा केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपने केला असे सेनेला वाटत असल्याने भाजप सेनेचे संबंध दुरावले गेले. अमित शाह हे मातोश्रीच्या दारी जात आहेत. राष्ट्रपती निवडणूक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कायम आग्रह असल्याने मित्र पक्ष म्हणून शिवसेनेशी जुळवून घेणे हे भेटीमागील कारण असले तरी अमित शाह हे काय चर्चा करणार याची उत्सुकता आहे. 

अमित शाह यांची पावले उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वांद्रयाच्या कलानगराकडे वळल्याने पुन्हा एकदा मातोश्रीचे महत्व अधोरेखित झाले आहे. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी शहा हे सकाळी आमदार खासदार आणि मंत्र्यांना वेळ देणार आहेत.

संध्याकाळी चार वाजता विलेपार्ले येथे ओपिनियन मेकर्स मीट हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर शहा दिल्लीला प्रयाण करणार आहेत 

संबंधित लेख