"चाणक्‍य' अमित शाह "हतबल' मायावतींना कां घाबरताहेत? 

सद्या देशात भारतीय जनता पार्टीला "अच्छे दिन' आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह ही जोडी राजकारणात नवनवे चमत्कार घडवित आहे. भाजपकडे बहुमत नसतानाही ते सत्ता खेचून घेत आहेत. पर्याय ठरु पाहणाऱ्या नितीशकुमारांसारख्या विरोधकालादेखील ते आपलेसे करुन दाखवत आहेत. अमित शाह यांची इमेज तर "चाणक्‍य' म्हणून झाली आहे. ते कधी कुठे उलथापालथ घडवतील, याचा नेम नाही, पण हेच शाह राजकीय अपयशाने हतबल झालेल्या मायावतींविरोधात लढण्याचे धाडस दाखवत नाहीत, हेही वास्तव आहे.
 "चाणक्‍य' अमित शाह "हतबल' मायावतींना कां घाबरताहेत? 
"चाणक्‍य' अमित शाह "हतबल' मायावतींना कां घाबरताहेत? 

पुणे: सद्या देशात भारतीय जनता पार्टीला "अच्छे दिन' आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह ही जोडी राजकारणात नवनवे चमत्कार घडवित आहे. भाजपकडे बहुमत नसतानाही ते सत्ता खेचून घेत आहेत. पर्याय ठरु पाहणाऱ्या नितीशकुमारांसारख्या विरोधकालादेखील ते आपलेसे करुन दाखवत आहेत. अमित शाह यांची इमेज तर "चाणक्‍य' म्हणून झाली आहे. ते कधी कुठे उलथापालथ घडवतील, याचा नेम नाही, पण हेच शाह राजकीय अपयशाने हतबल झालेल्या मायावतींविरोधात लढण्याचे धाडस दाखवत नाहीत, हेही वास्तव आहे. 

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसविण्यात उत्तर प्रदेशचा वाटा सर्वाधिक आहे. तो वाटा देण्यासाठीची भूमिका अमित शाह यांनी बजावली होती. 2014 ला 80 पैकी 72 खासदार भाजपाचे निवडून गेले. या निवडणुकीत मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची अक्षरश: धुळधाण उडाली. मायावतींचा एकही उमेदवार जिंकला नाही. पंतप्रधानपदाचे स्वप्न बघत असलेल्या मायावतींच्या वाट्याला दारुण पराभव आला. या पराभवातून धडा घेऊन मायावतींनी विधानसभेची रणनिती आखली. मात्र तिथेही अमित शाह यांनी काही चालू दिले नाही. विधानसभेला अखिलेश यादव, मायावतींचा पराभव करुन भाजपने उत्तर प्रदेश जिंकले. उत्तर प्रदेशात बसपाची निच्चांकी कामगिरी झाली. फक्‍त 18 आमदार निवडून येऊ शकले.मायावतींना नामोहरम करण्याची रणनिती शाह यांचीच होती. स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासारखे बसपाच्या पहिल्या फळीतील नेते शाह यांनी फोडले. मायावतींचे सोशल इंजिनिअरिंगचे गणित फेल करण्यासाठी काही दलित जातींचे समूह भाजपाशी जोडून घेतले. या प्रक्रियेत बसपाच्या अनेक फुटीर नेत्यांचा फायदा भाजपला झाला. प्रत्यक्ष विधानसभेच्या निकालातही भाजपने बाजी मारली. बसपा पार रसातळाला गेला. त्यानंतर महिनाभरापुर्वी राज्यसभेत आक्रमक झालेल्या मायावतींनी अचानक राजीनामा दिला. दलित अत्याचारप्रश्‍नी बोलू दिले जात नाही, म्हणून मायावती चिडल्या होत्या. त्यांचा राजीनामाही तातडीने मंजूर झाला. सातत्याने पराभव होत असल्याने मायावती हतबल झाल्याने त्या कांगावा करत असल्याची टीकाही त्यानिमित्ताने झाली. 

फुलपूरची पोटनिवडणूक होणार कां? 
लोकसभा निवडणुकीला अजून पावणे दोन वर्षांचा अवधी आहे. देशातील वातावरण पुर्णपणे भाजपाच्या बाजूने आहेत. विरोध पक्ष विखुरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांची एकत्रित मोट बांधण्याचे अवघड प्रयत्न कॉंग्रेसकडून सुरु असलेतरी, या प्रक्रियेत उत्साह नाही. विशेषत: उत्तर प्रदेशात भाजपा जे करेल ते होईल, अशी परिस्थिती असताना तेथील लोकसभेच्या पोटनिवडणुकांबाबत भाजपा सतर्क झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर निवडून आलेल्या आमदारांपैकी कोणाकडेही भाजपाने नेतृत्व दिले नाही. गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. फुलपूरचे खासदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले. मौर्य हे प्रदेशाध्यक्ष असताना बहुमत मिळाल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा होती. मात्र मोदी, शहा यांनी त्यांचा विचार केला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद घेताना ते काहीसे नाराज होते. आदित्यनाथ, मौर्य हे दोघे राज्य मंत्रीमंडळात आल्याने त्यांना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन उत्तर प्रदेश विधीमंडळात निवडून जाणे क्रमप्राप्त आहे. म्हणून उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर आदित्यनाथ यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला. मात्र केशवप्रसाद मौर्य यांना फुलपूरचा राजीनामा तुर्तास देऊ नका, असे सांगण्यात आले. 

मायावतींचा नव्याने उदय होण्याची भीती 
गोरखपूर लोकसभा मतदारसंघात नवा उमेदवार निवडून येईल, याची भाजपाला खात्री आहे. मात्र ती खात्री फुलपूरमधून नाही. फुलपूरची निवडणूक लागलीतर मायावती या रिंगणात उतरु शकतात. त्या निवडून येण्याची शक्‍यता असल्याने आणि मायावतींना सक्षम पर्याय भाजपकडे नसल्याने अमिह शाह यांची अडचण झाली आहे. 2009 ला फुलपूरमधून बसपाचा खासदार निवडून आला होता. 2014 ला तो खासदार समाजवादी पक्षाकडून उभा राहिला. तिथे भाजपचे मौर्य मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले. बसपा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मौर्य यांना मोठे मताधिक्‍य असलेतरी स्वत: मायावती रिंगणात आल्या आणि त्यांना विरोधी पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिलातर भाजपची नाचक्‍की होईल, या शक्‍यतेपोटी फुलपूरची समस्या भाजपपुढे उभे राहिली आहे. ही लढत झाली आणि मायावती निवडून आल्या तर त्यांचा नव्याने उदय होण्याची भीती भाजपला आहे. फुलपूरचा पराभव हा केशवप्रसाद मौर्य यांच्यासाठीसुद्धा धक्‍का असणार आहे. मायावतींशी टक्‍कर घेणारा नेता भाजपमध्ये नाही, हेही पुढे येणार आहे. या निकालाचे विश्‍लेषण अमित शाह यांना पुढे ठेवून होईल. त्यामुळे या निवडणुकीला सामोरे न जाता केशवप्रसाद मौर्य यांना केंद्रात मंत्रीपद देण्याच्या पर्यायाचा विचार सुरु आहे. 

मोदींचा रथ उत्तर प्रदेशात अडवला जाऊ शकतो ? 
फुलपूरची पोटनिवडणूक झाली आणि त्यात मायावती जिंकल्या तर हा विजय राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देऊ शकतो. उत्तर प्रदेशात बसपा आणि सपा यांनी एकत्र यावे, असा मतप्रवाह आहे. लालूप्रसाद यादव आणि शरद यादव यांच्यासारखे नेते यासाठी प्रयत्नशील आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने दलित राजकारण पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मायावती सहारनपूर दलित हत्त्याकांडाचा मुद्दा काढणारच. निवडणुकीतील यशावरुन पुढील लोकसभेची गणिते मांडली जावू शकतात. सपा आणि बसपा यांची विधानसभेतील टक्‍केवारी भाजपपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे संभाव्य समीकरण मोदींच्या 2019 च्या सत्तेला धोकादायक असल्याने मायावतींना संधीच देवू नये, या मताचे अमित शहा असावेत. मात्र राजकारणात अशक्‍य काही नसते. त्यामुळे मौर्य यांचा राजीनामा देवून भाजपा निवडणुकीला सामोरे जाते कां आणि मायावती निवडणुकीत उतरतात कां, हे पाहावे लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com