कॉंग्रेसच्या पाच पिढ्यांना गरिबी हटवता आली नाही - अमित शहा

 कॉंग्रेसच्या पाच पिढ्यांना गरिबी हटवता आली नाही - अमित शहा

जालना : देशात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते सोनिया गांधींपर्यंत कॉंग्रेसच्या पाच पिढ्यांनी गरिबी हटावचा नारा दिला. पण 55 वर्षाच्या सत्ताकाळात त्यांना गरिबी हटवता आली नाही. याउलट भाजपच्या 55 महिन्यात आम्ही देशातील गरिबांसाठी विविध योजना राबवून गरिबी हटवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला. 

जालन्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी (ता.18) आझाद मैदानावर अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमित शहांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवतांना जाहीरनाम्यातील गरिबी हटावच्या आश्‍वासनाची खिल्ली उडवली. अमित शहा म्हणाले, राहुल गांधी गरिबीवर भाष्य करतात. त्यांच्या पाच पिढ्या देत आलेला गरिबी हटावचा नारा पुन्हा ते देत आहेत. कॉंग्रेसच्या पंचावन्न वर्षाच्या शासनकाळात गरीबी दूर करण्यासाठी काहीच काम झाले नाही. मात्र, भारतीय जनता पार्टीच्या पंचावन्न महिन्यात साठ कोटी महिलांना गॅस, आठ कोटी कुटुंबाना स्वच्छतागृह, अडीच कोटी गरीब कुटुंबांना घरकुल देण्याबरोबरच दोन कोटी 35 लाख कुटुंबाच्या घरात वीज पोचवण्याचे काम झाले. 

भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना शेतीसाठी बिनव्याजी कर्ज, साठ वर्षानंतर पेन्शन देणार असल्याचेही अमित शहा यांनी यावेळी सांगितले. कॉंग्रेसच्या काळात राज्यात झालेल्या 72 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पातील पाणी किती शेतकऱ्यांपर्यंत पोचले असा सवाल करत याचा हिशोब शरद पवारांनी द्यावा असे आव्हान देखील अमित शहा यांनी केले. 

यावेळी खासदार रावसाहेब दानवे, राज्य मंत्री अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, संतोष दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, भागवत कराड, माजी आमदार संतोष सांबरे, विलास खरात, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर आदींची उपस्थिती होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com