Amit Shah, Sonia Gandhi & Zandu Bam | Sarkarnama

अमित शहांना सोनिया गांधींवर टीका करताना झंडू बाम का आठवला ?

सरकारनामा
सोमवार, 31 डिसेंबर 2018
सोनिया गांधी  यांच्यावर शेरेबाजी करताना अमित शहा यांनी ट्‌विटरवर धुराळा उडवला आहे .

नवी दिल्ली :  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना सोनिया गांधींवर टीका करताना चक्क झंडू बामची आठवण झाली आहे . अमित शहा यांनी  ऑगस्टा वेस्टलॅंड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यावरून गांधी घराण्यावर टीकेचा भडिमार केला आहे.

या संदर्भात अमित शहा यांनी चार ट्‌विट केले असून त्यामध्ये ते म्हणतात, " ख्रिस्तियान मिशेलच्या  वकिलाने राष्ट्रीय हित विचारात घेता 2008 मध्ये अस्तित्वात असलेल्या कागदपत्रां विषयी आम्हाला सांगितले पाहिजे. या कागदपत्रांमध्ये श्रीमती गांधी यांचा उल्लेख आहे. हे उघडच दिसते आहे की मिशेलचे एका भारतीय घराण्याशी खूप जुने आणि घनिष्ठ संबंध आहेत.''

श्री. अमित शहा आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, " ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात ख्रिस्तियान मिशेल याने चौकशी करणाऱ्यांच्या प्रश्‍नांची माहिती 'श्रीमती गांधी' यांच्यापर्यंत पोचविण्याचा मिशेल याचा विचार आहे का?  'श्रीमती गांधी' यांच्यावरून विचारलेल्या प्रश्‍नांची माहिती मिशेल याने त्याच्या वकिलाला का दिली? हे कोणाला माहीत आहे का, हे प्रश्‍न 'श्रीमती गांधी' यांच्यापर्यंत पोचावेत, अशी त्याची इच्छा आहे का?"

श्री. अमित शहा आपल्या आणखी एका ट्‌विटमध्ये म्हणतात, " युवा कॉंग्रेसचे पदाधिकारी अल्जो के. जोसेफ यांनी मिशेलचे वकील म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉंग्रेसने त्यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. राष्ट्रहितासाठी मिशेलच्या वकिलांनी 2008च्या दस्तऐवजांबद्दल आम्हाला माहिती द्यायला हवी. ही कागदपत्रे श्रीमती गांधी यांच्याशी संबंधित आहेत. मिशेल आणि भारतातील एका कुटुंबाची मैत्री ही दीर्घकालीन व घनिष्ट आहे, हे उघड आहे. कोणत्याही प्रकरणात एक गोष्ट वारंवार सांगितली जात आहे, ती म्हणजे मिशेलच्या वकिलाची कॉंग्रेसची पार्श्‍वभूमी. तथाकथित हकालपट्टी हे एक ढोंग आहे. मिशेल आणि 'श्रीमती गांधी' यांच्यामध्ये ते सेतूच्या रूपात वावरत आहेत.  "

श्री. शहा पुढे म्हणतात, " मिशेलच्या वकिलांनी मिशेलने आपल्याला तो कागद दिल्याचे मान्य केले आहे, पण त्यांना ते औषधाचे प्रिस्क्रिप्शन वाटले होते. आपण झंडू बाम ऐकला आहे. टायगर बामविषयीही आपण ऐकून आहोत. पण हा 'फॅमिली बाम' काय आहे की जो प्रत्येकच दलालाला हवा आहे? "

 

संबंधित लेख