भाजप नेत्यांना अमित शहा म्हणाले, ''शिवसेनेला दुखावू नका''!

विरोधकांची महाआघाडी म्हणजे एक भ्रम आहे. -अमित शहा
भाजप नेत्यांना अमित शहा म्हणाले, ''शिवसेनेला दुखावू नका''!

मुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी राज्यात शिवसेना- भाजपची युती होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला.

तसेच, शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला दुखावू नये, असा सल्लाही शहा यांनी दिला. 

राज्यात युती होईल आणि भाजप पुन्हा केंद्रात सत्तेवर येईल, शिवसेना- भाजपची युती लोकसभा निवडणुकांना सामोरी जाईल, सध्या शिवसेनेसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. 

मंगळवारी रात्री मुंबईत आलेल्या अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. या वेळी शिवसेनेबाबत कुणीही आक्षेपार्ह वक्‍तव्य करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. विरोधकांची महाआघाडी म्हणजे एक भ्रम आहे, अशी टीका करत अमित शहांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा केंद्रात सत्ता मिळवण्याचा विश्वासही व्यक्त केला. "महाआघाडी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत आम्ही त्या सर्वांचा पराभव केला होता. ते सर्व प्रादेशिक नेते आहेत आणि एकमेकांना साथ देऊ शकत नाहीत,' असेही शहा म्हणाले. 2019 मध्ये भाजप पश्‍चिम बंगाल, ईशान्येकडील राज्ये आणि ओडिशातही सत्ता मिळवेल, असा विश्वासही अमित शहा यांना व्यक्त केला. 
 
2014 मध्ये भाजपची केवळ सहा राज्यांत सत्ता होती, आता 16 राज्यांत आहे. मग 2019 मध्ये निवडणुका कोण जिंकेल? असा प्रतिप्रश्न शहा यांनी केला. राष्ट्रीय सुरक्षेबाबत आम्ही दिलेली हमी, भ्रष्टाचाराचा केलेला नायनाट, आठ कोटी घरांमध्ये शौचालयाची व्यवस्था आणि अडीच कोटी घरांमध्ये वीज उपलब्ध करून दिली. या मुद्द्यांच्या आधारे आम्ही निवडणूक लढवणार आहोत, अशी माहिती शहांनी दिली. 

मजबूत सरकार सत्तेत येणे ही फक्त भाजपचीच नाही, तर देशाचीही गरज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांतील निकाल भाजपच्या बाजूने नसले, तरी लोकसभा निवडणुकांशी त्यांचा संबंध जोडणे चुकीचे आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधात कोणीही असो, आम्ही आमच्या बलस्थानांवर जिंकू. 
- अमित शहा, अध्यक्ष, भाजप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com