अमित शहा : डावपेचांचा बादशाह

अमित शहा यांना डावपेचांचा बादशहा म्हणून राजकीय वर्तुळात ओळखले जाते. लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीयस्तरावर प्रतिमा निर्मिती करण्यासाठी अमित शहांनी पडद्याआडून मोहीम चालवली होती.
Modi-shah
Modi-shah

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांची देशाच्या गृहमंत्री पदावर नियुक्ती केल्याने शहा यांचा राष्ट्रीय राजकारणातील दबदबा वाढणार आहे.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आता अमित शहा नंबर दोनचे मंत्री ठरले आहेत. राजनाथसिंह यांना गुरुवारी मोदींनंतर लगेचच शपथ घेण्यासाठी पाचारण करण्यात आल्याने ते दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री ठरतील असे वाटत होते. पण अमित शहा यांनी गृहमंत्रिपदाची बाजी मारल्याने मोदींनंतर अमित शहाच महत्त्वाचे मंत्री ठरले आहेत. राजनाथसिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अमित शहा 55 वर्षांचे असून 1983 मध्ये ते अभाविप आणि 1987 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले. 1997 ते 2017 असे 20 वर्षे ते गुजरात विधानसभेचे आमदार होते. त्यांचे 1990 पासून नरेंद्र मोदी यांच्यांशी जवळचे संबंध निर्माण झाले. ते नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्‍वासू आणि निकटवर्तीय सहकारी  राहिलेले आहेत. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा  अमित शहा त्यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री होते. 

नरेंद्र मोदी 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले. ते 13 वर्षे मुख्यमंत्री होते. 2002 मध्ये मोदींनी अमित शहा यांना मंत्रिमंडळात घेतले. एकेवेळी अमित शहा यांच्याकडे गृह, विधी व न्याय, गृहनिर्माण, तुरुंग, दारूबंदी, परिवहन अशा 12 खात्यांचा कार्यभार होता. यावरून दोघांचे संबंध किती जवळचे आहेत आणि परस्परांविषयी दोघांना किती विश्‍वास आहे हे स्पष्ट होते.

अमित शहा आतापर्यंत महानगर पालिकेच्या नगरसेवक पदापासून ते खासदार पदापर्यंत 29 निवडणुका लढले असून अजून त्यांनी पराभवाचे तोंड पाहिलेले नाही. ते अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राहिले आहेत. तोट्यात असलेली ही बॅंक त्यांनी 7 वर्षांत 200 कोटी रुपयांनी नफ्यात आणली होती. 

अमित शहा आणि वाद हे जुने नाते आहे. 2010 मध्ये सोहराबुद्दीन शेख आणि तुलसी प्रजापती या दोघांचे एनकांउंटर घडवून आणल्याच्या आरोपाखाली सीबीआयने अमित शहा यांच्या विरुद्ध खून व अपहरणाची कलमे लावून गुन्हा दाखल केला होता. 25 जुलै 2010 मध्ये अमित शहा यांना या प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. 29 ऑक्‍टोबर 2010 मध्ये गुजरात हायकोर्टाने त्यांना जामीन देताना गुजरातमध्ये प्रवेश करण्यास बंदी केली होती. 

2010 ते 2012 या काळात दिल्लीतील गुजरात भवनमध्ये एका खोलीत ते राहात होते. सप्टेंबर 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमध्ये जाण्याची परवानगी दिली तेव्हा ते विधानसभा निवडणूक लढवू शकले होते. पुढे या प्रकरणात पुराव्याअभावी न्यायालयाने आरोपींच्या यादीतून अमित शहा यांचे नाव काढले. त्यानंतर या खटल्यातून अमित शहा यांची सुटका झाली. या संपूर्ण कालावधीत काँग्रेस पक्षातर्फे अमित शाह यांच्यावर हल्ले चढवले जात असतां नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या पाठीशी ठाम उभे होते . 

डावपेचांचा बादशाह    
अमित शहा यांना डावपेचांचा बादशहा म्हणून राजकीय वर्तुळात ओळखले जाते. लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीयस्तरावर प्रतिमा निर्मिती करण्यासाठी अमित शहांनी पडद्याआडून मोहीम चालवली होती. 

अमित शहा यांनी उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून 2014 मध्ये उत्तर प्रदेशात 80 पैकी 73 जागा भाजपकडे खेचून आणत आपल्या डावपेचांचे बळ दाखवून दिले होते. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत जुलै 2014 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाली. यंदाच्या निवडणुकीत पश्‍चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या बालेकिल्ल्यात भाजपचे 18 खासदार निवडून आणीत त्यांनी पुन्हा एकदा आपली स्ट्रॅटेजी वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे.

दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांनी एन्ट्री घेतली ती राज्यसभेच्या माध्यमातून. 2017 मध्ये त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले. यंदा लोकसभा पहिल्यांदाच लढविताना त्यांनी थेट देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. गुजरातमधील गांधीनगरमधून खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत.

कर्नाटक ,मध्य प्रदेश, राजस्थान अशा राज्यात भाजपला गेल्यावर्षी पराभव  पत्करावा लागला होता.गुजरातमध्येही काँग्रेसने भाषला फार अटीतटीची लढत दिली होती. पण  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांच्या डावपेचांनी या सर्व राज्यात भाषला घवघवीत यश मिळाले आहे . 
 
अमित शहा यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांशी संबंध सुधारण्यापासून ते पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, ईशान्येकडील राज्ये अशा राज्यात उत्तरेत खासदार कमी झाले तर त्याची भरपाई करण्याची तजवीज आधीच करून ठेवली होती. बिहारमध्ये नीतिशकुमार यांच्या पक्षाला लोकसभेच्या जागा वाटप करताना वाढवून जागा दिल्या. त्यासाठी भाजपच्या विद्यमान चार खासदारांना त्यांनी घरी बसवले.
आंध्र प्रदेशात वाय . एस. जगमोहन रेड्डी  यांच्याशी सेटिंग केलेले होती तर तामिळनाडूत जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुकला सत्ता टिकवून ठेवण्यासाठी मदत केली होती . 

महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेतून विस्तव जात नव्हता तेव्हा अमित शहा उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले आणि तासाभरात ठाकरेंचे मनही जिंकून घेतले.अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांचे इतके जुळले की जागावाटप चुटकीसरशी पार पडले आणि अमित शहांच्या फॉर्म भरण्यालाही उद्धव ठाकरे हजर होते.

पश्‍चिम बंगालमध्ये 27 ते 30 टक्के मतदार मुस्लिम आहेत. अनेक मतदारसंघ मुस्लिम बहुल आहेत. पण तेथे अमित शहांनी ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध श्रीराम नामाचे हत्यार वापरले. मोठा संघर्ष आणि हिंसाचार झाला पण अमित शहांनी तेथून भाजपचे 18 खासदार निवडून आणीत ममतांसाठी धोक्‍याची घंटा वाजवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com