Amit Shah behin Dalit vote bank | Sarkarnama

अमित शहांचा राज्यातील दलित मतांवर सर्वाधिक डोळा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जून 2017

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी अमित शहा यांनी आठवले यांच्यासाठी खास अशी बैठक बोलावली होती. या बैठकीत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हेच होते अशी माहितीही सूत्राकडून सांगण्यात आली.

मुंबई - रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून राज्यातील दलितांची मते आपल्याकडे वळविण्यात मागील तीन वर्षांत यशस्वी झालेल्या भाजपाचा दलित मतांवर सर्वाधिक डोळा आहे. राज्यात सर्वच आंबेडकरी पक्ष हे निवडणुकीत अपयशी ठरलेले असताना तिच स्थिती राज्यात येत्या काळात राहिली तर त्याचा सर्वाधिक लाभ हा भाजपालाच होऊ शकतो ही शक्‍यता लक्षात घेऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई भेटीच्या पहिल्याच दिवशी रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यासोबत स्वतंत्र अशी बैठक घेऊन त्यासाठीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी अमित शहा यांनी आठवले यांच्यासाठी खास अशी बैठक बोलावली होती. या बैठकीत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हेच होते अशी माहितीही सूत्राकडून सांगण्यात आली. या बैठकीत आठवले यांच्याकडून राज्यातील दलित मतांसोबत त्यांच्या भाजपाच्या संदर्भातील मानसिकता, त्यांचे विचार कशा प्रकारे बदलेले आहेत, ते भाजपाच्या बाजून कसे येत आहेत, याची सविस्तर माहिती घेतली असल्याचे सांगण्यात येते.

राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून दलित, मागासवर्गीय समाधानी असून त्यांच्यासाठी सरकाकरकडून चांगल्या योजना राबविल्या जात आहेत, यामुळे त्यांच्या सर्वांगिण विकासाचे कामे होत आहेत, यामुळे दलितांची संपूर्ण व्होट बॅंक ही आता भाजपाच्या बाजूनेच असल्याची माहिती या बैठकीत आठवले यांनी दिली असल्याचेही सांगण्यात येते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही या बैठकीत राज्यात दलितांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना आदींची माहिती शहा यांना दिली असल्याचेही सांगण्यात येते.

संबंधित लेख