अमित देशमुख अन्‌ निलंगेकरांमध्ये "जुगलबंदी' रंगते तेव्हा....

 अमित देशमुख अन्‌ निलंगेकरांमध्ये "जुगलबंदी' रंगते तेव्हा....

लातूर : "जिल्हा परिषदच नव्हे तर महापालिकाही पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या ताब्यात आहे. आता ते कुठलाही निर्णय घ्यायला मोकळे आहेत,' अशा खोचक शब्दांत आमदार अमित देशमुख यांनी निलंगेकरांवर निशाणा साधला. मात्र याला उत्तर देताना निलंगेकरांनी "आम्ही निर्णय तर घेऊच; पण त्याआधी अमितजी, तुम्ही दाढी वाढविण्याचा निर्णय का घेतला आहे, ते सांगा? एक मात्र खरे आहे. दाढी वाढवली की यश मिळते, असे देशात सगळ्यांना वाटू लागले आहे,' अशी टिपण्णी केली. दोघांमधील ही "जुगलबंदी' पाहून सभागृहात हास्याची कारंजी उडाली. 

देशमुख आणि निलंगेकर यांच्यातील "नाते' लातूरकरांसाठी काही नवे नाही. एकमेकांना शह-काटशह देण्याचा प्रयत्न नेहमीच होतो. त्यामुळे त्यांच्यातील "नात्यां'ची चर्चाही नेहमीच रंगते. हे दोन विरोधक शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता सोहळ्यात एका मंचावर आले होते. ते प्रथमच एकत्र आल्याचे चित्र पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या. अशा वातावरणातच दोघांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली अन्‌ त्याला श्रोत्यांनी दादही दिली. 

कार्यक्रमाच्या सुरवातीला माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्तेचा स्तर खालावला आहे, अशी नाराजी व्यक्त केली. हा स्तर वाढविण्यासाठी या शाळा शिव छत्रपती शिक्षण संस्थेला निलंगेकर यांनी चालवायला द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा धागा पकडून अमित देशमुख यांनी "जिल्हा परिषदेच्याच शाळा काय पालिकेच्या हद्दीतील शाळाही निलंगेकर चालवायला देऊ शकतात. कारण जिल्हा परिषद, पालिका त्यांच्याच ताब्यात आहे. निर्णय घ्यायला ते मोकळे आहेत,' असे सांगत निलंगेकरांना अडचणीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

इथेच न थांबता देशमुख पुढे म्हणाले, "संभाजी पाटील-निलंगेकर यांचे नाव घेतले की लगेच त्यांचा विरोधक म्हणून माझे नाव घेतले जाते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक निर्णयाला मी विरोध करणारच, असा समज अनेकांमध्ये पसरला आहे. खरतर हा गैरसमज आहे.' हे विधान संपताच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. विरोध केवळ निवडणुका येतात तेंव्हाच केला जातो. विकासाला विरोध करायचा नसतो, हे संस्कार माझ्यावर शिवराज पाटील-चाकूरकर आणि विलासराव देशमुख यांच्यामुळे झाले आहेत. त्यामुळे विकासाचा मुद्दा असेल तर मी निलंगेकर यांच्यासोबत आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. 

देशमुख यांच्या भाषणानंतर निलंगेकर बोलायला उठले. शाळा खासगी संस्थांना चालवायला दिल्या तर या निर्णयाला शिक्षकांचे म्हणणे ऐकून शिक्षक आमदार विरोध करू शकतात. कारण शिक्षक हे त्यांचे मतदार असतात. त्यांचे त्यांना ऐकावेच लागते, अशा शब्दांत त्यांनी या मुद्याला बगल दिली. आणि पुढे ते देशमुख यांच्याकडे वळले. स्वतःच्या दाढीवर हात फिरवत निलंगेकर म्हणाले, "आत्ताच मला पाशा पटेल विचारत होते की तुम्ही आणि देशमुखांनी दाढी ठेवायला का सुरवात केली. यामागचे "राज' काय आहे? खरतर दाढी ठेवले की चांगले चालते, असे देशात वातावरण आहे. त्यामुळे आमचे तर व्यवस्थित चालू आहे; पण तुम्ही का दाढी वाढवली?" ही कोटी संपताच देशमुख यांनाही हसू आवरले नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com