Amarsingh Pandit Taunts jaydatta kshirsagar in his absence | Sarkarnama

जयदत्त...एका आरतीने देव पावत नसतो , असे नरवडेकडे पाहून अमरसिंह पंडित म्हणाले  !

दत्ता देशमुख 
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

क्षीरसागर आणि पंडित राजकीय घराण्यांमध्ये पुर्वीपासून विळ्या - भोपळ्याचे सख्य आहे. पुतणे संदीप क्षीरसागर यांना बळ देऊन अमरसिंह पंडित हे जयदत्त क्षीरसागर यांचा जुना हिशोब चुकविण्याचा प्रयत्न करत आहेत.या दोघातील संघर्षाची अखेर कशी होते हे जिल्ह्यातील राजकारणासाठी महत्वाचे आहे . या दोघातील संघर्षाने जिल्ह्यातील राजकारणाची गणिते काही प्रमाणात बदलू शकतात . 

बीड : " जयदत्त...एका आरतीने देव पावत नसतो ! आणि हो तु नसला तरी शरद पवारांच्या उपस्थितीतला मेळावाही भव्य आणि यशस्वी होणार!", असा टोमणा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी जयदत्त नरवडे यांच्याकडे पाहून मारला . मात्र हा टोला जयदत्त क्षीरसागर यांना उद्देशून असल्याने जमलेल्या कार्यकर्त्यात हशा उसळला .

शरद पवार यांच्या  बीड येथील मेळाव्याच्या तयारीसाठी शनिवारी माजलगाव येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी माजलगाव बाजार समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान पंचायत समिती सभापतींचे पती जयदत्त नरवडे व्यासपीठावर होते. यावेळी भाषण करत असताना अमरसिंह पंडित यांनी नरवडेंकडे पाहून ‘जयदत्त..’एका आरतीने देव पावत नसतो, आणि तु आला नाहीस तरी मेळावा भव्य आणि यशस्वी होणारच’ असे वक्तव्य केले.  यावेळी जयदत्त क्षीरसागर तेथे नव्हते . 

क्षीरसागर आणि पंडित यांच्यात पुर्वीपासून विळ्या - भोपळ्याचे सख्य आहे. दोन्ही घराण्यांनी एकाच पक्षात राहून अनेक वेळा एकमेकांचे पराभवही घडवून आणलेले आहेत. सध्या राष्ट्रवादीत जयदत्त क्षीरसागर विरुद्ध विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके आणि अमरसिंह पंडित अशी आघाडी आहे. तिघांकडून सध्या क्षीरसागरांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना बळ दिले जात आहे. 

दरम्यान, आता जयदत्त क्षीरसागर विरोधात अमरसिंह पंडित यांना संदीप क्षीरसागर हे प्रभावी अस्त्र हाती आले आहे. त्या माध्यमातून क्षीरसागरांची कोंडी केली जात आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीची आरती केली. तसेच, पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचेही दर्शन घेतले.  शरद पवारांचा जिल्हा दौरा निश्चित झाला त्याचवेळी क्षीरसागरांच्या आरतीचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्या विरोधकांना आयते कोलित मिळाले  आहे. 
 

संबंधित लेख