भुजबळांना लटकवता मग आशिष शेलारवर कारवाई का नाही - प्रीती मेनन

भुजबळांना लटकवता मग आशिष शेलारवर कारवाई का नाही - प्रीती मेनन

मुंबई : मनी लॉन्डरिंग प्रकरणात माजी मंत्री छगन भुजबळ यांना लटकवता, कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना माध्यमांवर, आपचे नेते व मंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरांवर सीबीआयचे छापे टाकता, मग अशाच प्रकारे कोट्यवधींचा मनी लॉन्डरिंग घोटाळा केलेल्या आणि त्याचे सबळ पुरावे असलेल्या भाजपच्या मुंबई प्रदेशाध्यक्षांवर सीबीआय आणि राज्य सरकार का कारवाई करत नाही, असा सवाल आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना केला. 

शेलार यांच्या विरोधात आपल्याकडे सबळ पुरावे असून त्यासाठी आपण आज ईडी आणि सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे, त्यापूर्वी अनेकदा आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती, मात्र मुख्यमंत्री शेलार यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून आले. राज्यात भाजपाच्या काळात कोट्यवधी रूपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली असून त्यातील 45 प्रकरणांची सर्व पुरावे आणि त्याची माहिती आम्ही द्यायला तयार असून अमित शहा या सर्व भ्रष्टाचारांच्या प्रकरणांकडे लक्ष देवून कारवाई करतील काय असा, सवालही त्यांनी केला. 

शेलार यांनी सर्वेश्‍वर नावाच्या कंपनीच्या माध्यमातून कोणतेही इतर कामकाज न करता केवळ कोट्यवधी रूपयांचा मनीलॉन्डरिंग धंदा केला असून त्यात त्यांनी ज्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत अशा महेश बल्दी याला पार्टनर म्हणून घेतलेले आहे. त्याची सर्व माहिती सीबीआयकडे असतानाही सीबीआयकडून शेलारवर का छापे नाही, त्यांना ईडी आणि सरकारही वाचवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
शेलार यांनी 2010 मध्ये वानखेडे स्टेडियमचे नुतनीकरण करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात घोटाळा केला असल्याचा आरोप संघ व भाजपाचे माजी पदाधिकारी सुनील शिंदे यांनी केला. या घोटाळ्याच्या संदर्भात आपण धर्मादाय आयुक्‍ताकडेही तक्रारी केल्या असून तिथेही आपल्याला केवळ तारखांच्या पलिकडे काही मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला. 

राज्यात एका भ्रष्टाचार युगाला सुरूवात 
भाजपच्या काळात राज्यात भ्रष्टाचार युगाला सुरूवात झाली असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक भ्रष्टाचारी मंत्री आणि त्यासोबत भाजपाचे अध्यक्षही भ्रष्टाचारी असताना त्यांच्यावर सरकारकडून पाठराखण केली जाते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: भ्रष्टाचारी मंत्र्यांना क्‍लिन चीट देतात, त्यामुळे राज्यात भ्रष्टाचाराच्या युगाला सुरूवात झाली असल्याचा दावा आपच्या नेत्या मेनन यांनी केला.

आपल्याकडे भाजपाचे मंत्री आणि अध्यक्ष असलेल्या मंडळींची 45 भ्रष्टाचारांची प्रकरणे असून त्यावर अमित शहा यांनी कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. मेनन यांनी दिलेल्या यादी प्रामुख्याने भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह फडणवीस सरकारमध्ये असलेल्या सेना-भाजपाच्या मंत्र्यांमध्ये पंकजा मुंडे, अर्जून खोतकर, चंद्रशेखर बावनकुळे, दिपक सावंत, दिवाकर रावते, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, जयकुमार रावल, प्रकाश मेहता, रणजीत पाटील, रविंद्र वायकर, सुभाष देशमुख, विनोद तावडे, विष्णू सावरा यांचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com