alligation on wai co vidya pol | Sarkarnama

co विद्या पोळ यांना हटवण्यासाठी वाईचे सत्ताधारी- विरोधक एकवटले!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे.

सातारा :  वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्या मनमानीमुळे आज सुमारे दोन कोटीचा निधी परतीच्या मार्गावर आहे. पोळ यांना कामात सुधारणा करण्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदत देत आहोत. त्यांनी कामात सुधारणा केली नाही तर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. यासाठी नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधक सर्व नगरसेवकांना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे, उपाध्यक्ष अनिल सावंत, विरोधी पक्षनेते सतीश वैराट यांच्यासह सर्व नगरसेवक यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिला आहे.

नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे, उपाध्यक्ष अनिल सावंत म्हणाले, आज पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सभागृहात सर्व नगरसेवक सभेसाठी आले होते. परंतू मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्यासह सर्व खातेप्रमुखांची सभागृहात गैरहजेरी होती. पालिकेची सर्वसाधारण सभा असतानाही मुख्याधिकारी व अधिकारी वाई शहरातील अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेवर गेले होते. शहराच्या विकासापेक्षा मुख्याधिकार्‍यांना अतिक्रमणे महत्वाची वाटत आहेत. विद्या पोळ या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पदाधिकारी व सर्व नगरसेवक यांना विश्‍वासात न घेता निर्णय घेत आहेत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे आज पालिकेचे मोठे नुकसान होत आहे. तक्रारी घेउन येणार्‍या नागरिकांनाही विद्या पोळ भेटत नाहीत. नगरसेविका महिलांनाही त्यांच्या केबिनमध्ये येऊन देत नाहीत. अशा पध्दतीने सर्वांशीच त्या हिटलशाहीने वागत आहेत. पोळ या वाईमध्ये रहात नाहीत. त्या सातारवरून ये-जा करीत आहेत. आठवड्यातून केवळ तीन दिवसच येतात असा आरोप ही यावेळी करण्यात आल्या. 

विरोधी पक्षनेते सतीश वैराट म्हणाले, जिल्हाधिकार्‍यांनी  25 ऑक्टोंबर रोजी स्वच्छ सर्वेक्षण 2019 नुसार शासन स्तरावर शहर समन्वय पदावर नियुक्ती केली होती. पण त्यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधूनही त्यांनी एमआयएस अपलोड केले नाही. याची गंभीर दखल घेवून जिल्हाधिकारी सिंघल यांनी मुख्याधिकारी पोळ यांना लेखी खुलासा मागविला होता. तसेच आवश्यक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. पण मुख्याधिकार्‍यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णध एकमुखी निर्णय झाला आहे. 

यावेळी नगरसेवक महेंद्र धनवे, दिपक ओसवाल यांच्यासह महिला नगरसेविका आरती कांबळे, शितल शिंदे ,स्मिता हागीर, रेश्मा जायगुडे, सिमा नायकवडी, प्रियांका डोंगरे, रूपाली वनारसे आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख