alligation on shivraj more by aanandrao patil supporters | Sarkarnama

शिवराज मोरेंचा बोलवता धनी वेगळा, म्हणून पृथ्वीराज चव्हाणांचे त्यांनी ऎकले नाही!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

आमदार आनंदराव पाटील यांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने नेहमीच संयम व समन्वयाची भुमिका घेतली आहे. याचा अर्थ ते दुबळे आहेत, असे समजू नका !

कऱ्हाड (सातारा): आपली वाकड्या शेपटाची चाल बदला अन्यथा ती चाल सरळ करण्याची धमक आम्हा युवकात आहे, असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एनएसयुआयचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

पक्षात दूफळी निर्माण होवू नये म्हणून आमदार आनंदराव पाटील यांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने नेहमीच संयम व समन्वयाची भुमिका घेतली आहे. याचा अर्थ ते दुबळे आहेत, असे समजू नका, असा सल्ला ही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

श्री. मोरे यांनी काँग्रेस पक्षात आमदार आनंदराव पाटील यांची हुकूमशाही चालते, अशी टीका केली होती. त्याला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.

निवेदनावर शहराध्यक्ष राजेंद्र माने, प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन पाटील, जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी प्रदीप जाधव, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, युवकचे दक्षिण तालुकाध्यक्ष वैभव थोरात, अल्पसंख्याक सेलचे सचिव आदील मोमीन, युवकचे पाटण तालुकाध्यक्ष गिरीष पाटील, युवकचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत चव्हाण, युवकेच जिल्हा सरचिटणीस अवधूत डुबल, युवकचे जिल्हा सचिव प्रसांत चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनात म्हटले की, जिल्हा युवक काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एनएसयुआयचे नेते शिवराज मोरे यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.ते अपयश सहन न झाल्याने त्यांनी आगपाखड केली होती. वास्तविक अस्तीत्व नसलेल्या एनएसयुआयच्या अध्यक्षांनी पराभवानंतर केलेली आगपखाड त्यांच्या मर्यादा स्पष्ट करणारी आहे. पक्ष संक्रमणात असतानाही आनंदराव पाटील यांनी पक्षाची बांधणी केली आहे. सोळा वर्षे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या, पक्षनिष्ठा राखत सगळ्यांचा समन्वय साधत पक्षाची धुरा सांभाळली आहे. याउलट पक्ष वाढीसाठी मोरेंनी जिल्ह्यात काय केले, किती कार्यक्रम घेतले याचा खुलासा करावा. पक्षातंर्गत गटबाजी करण्याचे उद्योग आपण केले. वरिष्ठ नेत्यांची चापलूसी करून त्यांची दिशाभूल होईल, अशी चुकीची माहिती देण्यापेक्षा वेगळे काम आपण केलेले नाही. पक्ष कार्य करण्याची आपली कुवतही नाही. जर एवढी धमक होती तर तुम्हा पालिकेच्या निवडणुकीत स्वतः उमेदवारी घेतली नाही, याचे उत्तर द्या. युवक कॉग्रसेच्या पदाधिकारी कॉग्रसेचा होता ना, मग त्याला मारहाण करून आपण साध्य काय केले. पक्षाचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी समझोता घातल्यावरसुद्धा आपण पत्रकबाजीचे नको ते उद्योग केले. ते उद्योग आपण का करता, आपल्या बोलवित्या धन्याच्या सांगण्यावरून करत आहात. त्यामुळे या सर्व प्रकारात आपण दोषी आहात, असे सिद्ध झाल्यास आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार  का, असा प्रश्नही त्यांना विचारून आव्हान दिले आहे.

संबंधित लेख