akola zp | Sarkarnama

बाळासाहेब तुमचा आमच्यावर भरोसा नाय काय ?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारिप-बमसंने गठीत केलेली तीन सदस्यीय समिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी या समितीशी चर्चा करूनच योजनांची अंमलबजावणी करण्याचा फतवा पक्षश्रेष्ठींनी काढल्याने बाळासाहेब तुमचा आमच्यावर भरोसा नाय काय? अशी म्हणण्याची वेळ भारिप - बमसंच्या जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांवर आली आहे. 

बहुजन, मागासवर्गीयांच्या चळवळीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रीत करणारा भारिप-बमसंचा "अकोला पॅटर्न' अकोला जिल्ह्यातच बिकट झाल्याचे दिसून येत आहे. पक्षात वाढलेले कुरघोडीचे राजकारण आणि त्यातून गटा-तटाच्या राजकारणात विभागला गेलेला पक्षाचा कार्यकर्ता, अशा परिस्थितीमुळे विधानसभा, नगरपालिका आणि नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भारिप- बमसंला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. 

या अपयशावर विचारमंथन करीत पक्षाने नव्याने मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्हा परिषदेत गेल्या पंधरा वर्षांपासून भारिप-बमसंची सत्ता आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांची उदासिनता आणि टक्केवारीत गुरफटलेल्या काही सदस्यांच्या कार्यपद्धतीमुळे कोट्यवधी रुपयांच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यास भारिप-बमसंला अपयश आले. 

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता रखडलेल्या योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील गोर-गरीबांना लाभ देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यासाठी भारिप बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने माजी आमदार हरिदास भदे, ज्ञानेश्वर सुलताने, सिद्धार्थ सिरसाट यांची एक समिती गठीत करण्यात आली. 

जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांच्या कार्यवाहीचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. सदस्यांनी या समितीशी चर्चा करावी, असे आदेश पक्षाचे सरचिटणीस ज. वि. पवार यांनी दिले आहेत. मात्र, ही समिती जिल्हा परिषदेच्या योजनांची अंमलबजावणी करणार असेल तर मग सदस्यांनी करावे काय? अशी चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगली आहे. 

संबंधित लेख