सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात कायद्याचा धाक संपला : रविकांत तुपकर 

भाजप सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात कायद्याचा धाक संपला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी "सरकारनामा'शी बोलताना केला.
ravikant tupkar
ravikant tupkar

अकोला : विरोधी पक्षात असताना अवैध सावकारांविरोधात गळा काढत त्यांना बेड्या ठोकण्याची भाषा करणारे भाजपवाले आता त्यांची सत्ता आल्यावर सावकारांची पाठराखण करीत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी, मजूर, कामगार, महिलांमध्ये असुरक्षितेची वातावरण पसरले आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात कायद्याचा धाक संपला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी "सरकारनामा'शी बोलताना केला. 

राज्यात अवैध सावकरांच्या जाचाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. या सावकारांची गुंडगिरी एवढी वाढली आहे, की शेतकऱ्यांचे खुलेआम हत्याकांड करण्यात येत आहे. खामगाव तालुक्‍यातील जळका भडंग येथे शुक्रवार (ता.8) अवैध सावकारीतून दोन सख्या भावांचे हत्याकांड करण्यात आल्याच्या घटनेने बुलडाणा जिल्हा हादरला आहे. या हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. 

यावेळी तुपकर म्हणाले, की राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून गुन्हेगारांना कायद्याचा धाक संपला आहे. 
नगरला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे घडलेले हत्याकांड, जामखेड हत्याकांडासह दिवसाढवळ्या दरोडे, चोऱ्या, महिलांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, गृह खाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असताना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास ते अपयशी ठरत आहेत. विरोधी पक्षात असताना भाजपचे नेते अवैध सावरकारांविरोधात मोठ-मोठ्याने गळा काढत त्यांना बेड्या ठोकण्याची भाषा करीत होते. मात्र, सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकरी स्वतःचे जीवन संपवित असताना शेतकऱ्यांच्या वेदनांवर फुंकर घालून त्यांना न्याय मिळवून देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. 

अवैध सावकारीच्या जिल्हा निबंधकांकडे तक्रारी केल्या तरी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. कारण मंत्र्यांच्या इशारावर अधिकारी निर्णय देत असल्याने सरकार सावकारांची पाठराखण करीत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करू नये. तुमच्या पाठिशी स्वाभिमानी शेतकरी संघटना ठामपणे उभी असून न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही थराला जावून लढा उभारण्यासाठी सज्ज आहे. सरकारला सावरकारांविरुद्ध कठोर पावले उचलणे जमत नसेल तर तसे सांगावे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अवैध सावरकारांना स्वाभिमानीचे कार्यकर्ते झोडून काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com